अख्खे आरटीओ कार्यालयच न्यायालयात : Video

अनिल जमधडे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

  • मानहानीच्या दाव्यात आरटीओ कार्यालयाची नामुष्की
  • 21 कर्मचाऱ्यांनी लावली न्यायालयात हजेरी 
  • आरटीओ कार्यालय पडले ओस 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर त्यावर आटीओ अधिकाऱ्यांनी उलट पोलिसात तक्रारी केल्या. त्यामुळे मानहानी झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने न्यायालयात केली. परिणामी, सर्व कर्मचारी न्यायालयात गेल्याने गुरुवारी (ता. 21) आरटीओ कार्यालय ओस पडले होते. 

आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण दगडू माडूकर यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार उघडकीस आणल्यामुळे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी मूळ तक्रारीची शहनिशा न करता उलट श्री. माडूकर यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांकडे सप्टेंबर 2016 मध्ये तक्रार केली.

माडूकर हे वीस वर्षांपासून दलालीचा व्यवसाय करतात, महिलांचा मानसिक छळ करतात, माहिती अधिकाराचा गैरवापर करून अधिकारी व कर्मचारी यांना ब्लॅकमेल करतात व अधिकाऱ्यांवर दबाव आणतात अशी तक्रार दिली. या तक्रारीमुळे मानहानी झाल्याचा फौजदारी दावा श्री. माडूकर यांनी न्यायालयात केले.

हेही वाचा : चक्क पोलिसाला 78 हजाराचा गंडा 

44 जणांच्या विरोधात तक्रार 

या प्रकरणात तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्यासह जवळपास सर्व म्हणजे 44 अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात ही तक्रार केली. या प्रकरणात न्यायालयाने तक्रार केलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. विशेष म्हणजे यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत; तर तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी शेळके निवृत्त झालेले आहेत. 

क्‍लिक करा : चक्क सेवानिवृत्त आयजीच्या कारवर अंबर दिवा 

21 जणांची न्यायालयात हजेरी 

न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी (ता. 21) आरटीओ कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांनी न्यायालयात हजेरी लावली. सर्वच कर्मचारी न्यायालयात गेल्याने आरटीओ कार्यालय मात्र ओस पडले होते. आरटीओ कार्यालयात तक्रारीच्या नंतरच्या काळात आलेल्या तीन अधिकारी व चार कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही हजर नव्हते. त्यामुळेच नागरिकांचे वाहन परवाना वगळता अन्य कामे होऊ शकली नाहीत. 

काय आहे मूळ तक्रार? 

अरुण दगडू माडूकर यांनी दिलेली मूळ पुराव्यानिशी तक्रार अशी : अनुकंपा बोगत भरती, कर चुकवेगिरी, बनावट जाद दर्शवून नोकरी मिळवणे, चुकीच्या पद्धतीने पदोन्नत्या मिळवणे, तीन वर्षे गैरहजर असताना वेतन उचलणे, एकच परवाना अनेक वाहनांना देणे, विनामूल्य पसंती क्रमांक देणे, एकरकमी करात व शासनाच्या रकमेचा अपहार करणे, पदाचा अपहार करणे, अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ना हरकत प्रमाणपत्र बहाल करणे अशा अनेक प्रकरणांची माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून माडूकर यांनी सविस्तर प्रत्येकाच्या नावानिशी व केलेल्या गैरप्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत. 

खोट्या तक्रारी दिल्या
भ्रष्टाचाराच्या सर्व तक्रारींचे पुरावे दिलेले असताना, चौकशी न करताच माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दिल्या. खोट्या तक्रारीने मानहानी झाली. त्यामुळे सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. 
-अरुण दगडू माडूकर (तक्रारकर्ते) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AURANGABAD RTO NEWS