शिवसेनेचा धडकला विभागीय आयुक्‍तालयावर मोर्चा

मधुकर कांबळे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • आमदाराचे वाहन सोडले, माजी खासदाराचे अडवले 
  • शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी काढण्यात आला मोर्चा 
  • जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर एकाच वेळी 

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर शिवसेनेच्यावतीने सोमवारी (ता.25) धडक मोर्चा काढण्यात आला. घोषणा देत हा मोर्चा विभागीय आयुक्‍तालयाच्या परिसरात दाखल झाला. मोर्चा जसा जसा जवळ येत होता तसा नेत्यांची वाहने पुढे सरकत होती. विधानपरिषद सदस्य आमदार अंबादास दानवे यांचे वाहन येताच त्यांच्या वाहनाला बंदोबस्तावरील पोलिसांनी रस्ता करुन दिला मात्र माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाहनाला न सोडल्याने त्यांचे वाहन दिल्लीगेट परिसरात उभे करावे लागले. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात सोमवारी (ता.25) एकाच वेळी प्रत्येक तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरामध्ये विभागीय आयुक्‍तालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनचे आमदार या मोर्चांचे त्या त्या ठिकाणी नेतृतव करणार होते, मात्र सध्या राज्यातील सत्तास्थापनेच्या खेळात सर्व आमदार एकत्रच असल्याने आमदारांशिवाय हे मोर्चे निघाले. सकाळी साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातुन मोर्चाला सुरुवात झाली.

वाचा ः शाळा महाविद्यालयांच्या या लढ्याला आले यश 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली. गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा विभागीय आयुक्‍तालयावर दाखल झाला. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ आदींचा समावेश होता. 

मोर्चा सुरु झाल्यानंतर नेत्यांची वाहने मोर्चाच्या पुढे
 
मोर्चा सुरु झाल्यानंतर नेत्यांची वाहने मोर्चाच्या पुढे निघाली होती. मोर्चा विभागीय आयुक्‍तालयापर्यंत पोहचेपर्यंत सर्वांची चारचाकी वाहने आयुक्‍तालयावर दाखल झाली. आयुक्‍तालयाजवळ मुख्य रस्त्यावरच बॅरीकेटस लावुन रस्ता बंद करण्यात आला होता. इथे आमदार अंबादास दानवे यांच्या वाहनाला बंदोबस्तावरील पोलिसांना रस्ता मोकळा करुन दिला, मात्र माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाहनाला सोडले नाही यामुळे चालकाने त्यांचे वाहन दिल्लीगेटकडील बाजूला नेउन उभे केले. नेत्यांच्या वाहनाला अडवल्याने महापौरांच्या वाहनाच्या चालकानेही वाहन शिवसेना नेते श्री.खैरे यांच्या वाहनाजवळ उभे केले. नंतर श्री. खैरे, श्री. दानवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ विभागीय आयुक्‍तांना भेटण्यासाठी गेल्यानंतर श्री. खैरे यांच्या वाहनाला पोलिसांनी सोडले. 

 हेही वाचा -   मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण

या मागण्यासाठी मोर्चा 

  •  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांर्चंया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे नियमाप्रमाणे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झघल्यास त्यांना विमा कंपन्यांनी 25 टक्‍के नुकसानभरपाई आगाउ देणे बंधनकारक आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. 
  •  शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी पिक विमा कंपन्यांनी जिल्हा व तालूकास्तरीय वाढीव मनुष्यबळ तैनात करावे , पिकांना हेक्‍टरी 8 हजार तर फळबागांना हेक्‍टरी 18 हजार नुकसान भरपाई अतिशय कमी असून यामध्ये वाढ करण्यात यावी 
  •  काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा व अन्य स्वरुपांचे अनुदान जमा झाले असले तरी काहींच्या खात्यातुन बॅंकांनी परस्पर रक्‍कम कर्ज खात्यावर वळवुन घेतले आहे तर काही बॅंकांनी शेतकऱ्यांचे खाते गोठवले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांचे खाते गोठवू नये त्याचप्रमाणे असे खाते गोठवणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी 
  •  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमुक्‍तीच्या आजपर्यंत 18 ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत मात्र अजूनही याविषयी हजारो शेतकऱ्यांना माहिती नाही. यामध्ये नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा समावेश असून प्रशासनाने गावपातळीवर जाउन या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळउन द्यावा. 
  •  बॅंकांकडून सद्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे बॅंकांमार्फत करण्यात येत असलेली सक्‍तीची कर्जवसुली थांबवण्यात यावी. 
  •  शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप सुरु करावे . 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad shiv sena farmars prolems