वाघ, कोल्ह्याचं काय, सर्पालयही घ्या दत्तक! 

मधुकर कांबळे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

  • महापालिकेची दत्तक योजना.
  • एक वाघ दत्तक घेण्यासाठी दोन लाख, हरिणासाठी दोन लाख, पक्षिगृहासाठी दोन लाख, सर्पालय
  •  मत्सालय दत्तक घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख तसेच कोल्हा, उदबिल्ला, नीलगाय यासह इतर प्रजातींच्या प्राण्यांसाठी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वर्षाला खर्च दत्तक घेणाऱ्या दात्यांनी प्राणिसंग्रहालयाला देणे अपेक्षित आहे.

औरंगाबाद - अनेकांना आपल्याकडे एखाद्या प्राणी, पक्षी असावा असे वाटते अशा प्राणी-पक्षीप्रेमींना त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहार, देखभालीची सोय व्हावी यासाठी महापालिकेकडून प्राणी दत्तक योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वीही अशी संकल्पना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत वाघ, हरीण, सर्पालय, मत्स्यालय, पक्षिगृहासह 307 प्रकारचे प्राणी, पक्षी दत्तक दिले जाणार आहेत. यासाठी विविध सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यावसायिक संस्थांनी या प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले आहे. 

कोण म्हणाले - महापरीक्षा पोर्टल बंद करा

मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात आजघडीला वाघ, हरीण, नीलगाय यांसह 19 प्रजातीचे 307 प्राणी आहेत. या प्राण्यांच्या आहार व देखभालीवर महापालिकेला रोजचा लाखोंचा खर्च येतो. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातून येणारे शुल्क आणि प्राण्यांवर होणारा खर्च यातून महापालिकेच्या पदरात खूपच कमी उत्पन्न पडते. त्यामुळे प्राण्यांवरील खर्च प्राणी दत्तक देऊन कमी करण्याचा दत्तक योजना लागू करण्यामागे महापालिकेचा उद्देश आहे. तथापि, काही वर्षांपूर्वी काही दात्यांनी समोर येत वाघ, हत्ती, हरीण यांसह काही प्राणी दत्तक घेतल्याने महापालिकेची प्राण्यांवरील खर्चात बचत झाली होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून दातेच समोर आले नसल्याने ही योजना बंद पडली. या पार्श्वभूमीवरच शुक्रवारी महापौरांनी प्राणिसंग्रहालय विभागाची आढावा बैठक घेतली. प्राणी दत्तक योजना पुन्हा राबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राणी दत्तक घेण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यावसायिकांनी समोर यावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

शेतकऱ्यांचा असाही सन्मान - तलाठी कार्यालयाने दिली भन्नाट नावे

वाघ, हरीणसाठी वार्षिक दोन लाख 
 
प्राणी दत्तक देण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार एक वाघ दत्तक घेण्यासाठी दोन लाख, हरिणासाठी दोन लाख, पक्षिगृहासाठी दोन लाख, सर्पालय व मत्सालय दत्तक घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख तसेच कोल्हा, उदबिल्ला, नीलगाय यासह इतर प्रजातींच्या प्राण्यांसाठी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वर्षाला खर्च दत्तक घेणाऱ्या दात्यांनी प्राणिसंग्रहालयाला देणे अपेक्षित आहे. त्यानी दिलेल्या रकमेतून त्यांनी दत्तक घेतलेल्या प्राण्याच्या आहार, देखभालीचा खर्च भागवता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. 

असं कसं झालं - सत्ता भाजपची, महापौर मात्र कॉंग्रेसचा

प्राण्यांच्या माहितीचे लागले फलक 

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वःखर्चातून प्राण्यांच्या माहितीचे पाच मोठे तर 24 छोटे फलक लावले आहेत. या फलकांवर प्राण्यांची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, प्राणिसंग्रहालयात कधी व कुठून आणले याची सविस्तर माहिती दिलेली आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad sidharth zoo taiger  fox adoption scheme