औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पहाटेचा प्रवास ठरतोय धोकादायक; चोऱ्यांचं प्रमाण वाढलं

national highway
national highway

उस्मानाबाद: औरंगाबाद ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. प्रवाशांना लुबाडण्याच्या दोन घटना एका महिन्याच्या अंतराने घडल्याने हैदराबादहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही बाब धोक्याची घंटा मानली जात आहे.

औरंगाबाद ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशी वाहतूक वाढली आहे. पूर्वी अरुंद रस्ता अपघाताला निमंत्रण देत होता. आता संपूर्ण मार्गावर डिव्हायडर टाकण्यात आला आहे. पूर्वी अपघात होत असले तरी डिव्हायडर नसल्याने लुटमारीचे प्रकार अल्प प्रमाणात घडत होते. आता मात्र लुटमारीच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. येरमाळा परिसरात यापूर्वी प्रवाशांना लुटण्याचा प्रकार घडला होता. शनिवारी (ता. १३) पहाटे वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान असे प्रकार घडणे, येथील उद्योग आणि हॉटेल व्यावसायाला धोक्याची घंटा मानली जात आहे.

लुटण्याचा प्रकारात साम्य
येरमाळा (ता. कळंब) येथे महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. पहाटेच्या वेळी वाहनाच्या खाली जॅक टाकून वाहन अडवण्याचा प्रकार घडला होता. वाहनाच्या खाली काय आहे, हे चालकाने गाडी थांबवून पाहिले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लुटारुंनी प्रवाशांना मारहाण करून ऐवज ओरबाडून धूम ठोकली होती. वाहनाच्या खाली जॅक टाकल्याचे पोलिस चौकशीत उघडकीस आले होते. त्यानंतर इंदापूर (ता. वाशी) येथील साखर कारखाना परिसरात असाच प्रकार शनिवारी पहाटे घडला आहे. वाहनाच्या खाली जॅक टाकल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन खड्ड्यात गेले. त्यावेळी दबा धरून बसलेल्यांना प्रवाशांना मारहाण करून त्यांच्या अंगातील दागीने लंपास केले होते.

प्रवास ठरतोय धोकादायक
हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात साईबाबा भक्त दर्शनसाठी शिर्डीकडे जातात. त्यांच्या छोट्या मोटारी असतात. अशा मोटारींमधून रात्रीच्या वेळेचा प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. आयआरबी कंपनीकडे या महामार्गीची सूत्र आहेत. पोलिसही या मार्गावर गस्त घालतात. तरीही असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे शिर्डीचे दर्शन धोकादायक ठरू लागले आहे.

व्यवसायिकांना धोक्याची घंटा
दररोज हजारो भाविक दर्शनासाठी शिर्डी, वेरुळ अजिंठा अशा भागात जातात. प्रवासाच्या दरम्यान असे नागरिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतात. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या अनेकांचे व्यावसाय वाढले आहेत. मात्र गाडी आडवून लुबाडणुकीचे प्रकार घडले तर या मार्गावरील वाहतूक कमी होऊ शकते. शिवाय अनेक प्रवाशी पर्यायी मार्गाचा अवलंब करू शकतात. त्यामुळे अशा घटना यापुढे होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविण्याची गरज सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे.

लुटमारीचा यापूर्वीचा प्रकार आणि शनिवारी पहाटे घडलेल्या प्रकारात साम्य आहे. आमचा तपास योग्य रितीने सुरू आहे. पण, असे प्रकार होऊ नयेत, असा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच आम्ही आरोपींना ताब्यात घेऊ.
- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, वाशी.

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com