औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

""प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी औरंगाबाद-टापरगाव व टापरगाव ते कन्नड सेवा देण्यात येत आहे. यामुळे 26 किलोमीटरचा फेरा वाचला आहे.''
-आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक

देवगाव रंगारीमार्गे नेण्याचा बदल केला रद्द

औरंगाबाद : औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्‍यातील टापरगाव येथील शिवना नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून पुलावरून होणारी एसटीची वाहतूक गुरुवारपासून (ता.24) इतर मार्गाने वळविण्याचे आदेश वाहतूक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारपासून (ता.29) अर्ध्या तासाला औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू केली आहे. देवगाव रंगारीतर्फे करण्यात आलेला बदलही रद्द करण्यात आला आहे.

औरंगाबादकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगाव-मालेगावमार्गे धुळ्याकडे सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे 26 किलोमीटरचा फेरा वाढविण्यात आला होता. 32 रुपये भाडेवाढही करण्यात आली होती; मात्र हा मार्ग लांब पल्ल्याचा असल्यामुळे प्रवासी घटले होते. त्यानंतर औरंगाबाद ते टापरगाव आणि टापरगाव ते कन्नड व धुळे बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, औरंगाबाद-टापरगाव 45 किलोमीटरपर्यंत दर अर्ध्या तासाला बसगाडी चालविण्यात येणार आहे. सकाळी सहापासून रात्री आठपर्यंत दहा बसगाड्यांच्या 60 फेऱ्या होणार आहेत. याचे नियोजन करण्यात आले आहे. कन्नड डेपोकडून टापरगाव ते कन्नड आणि पुढे धुळ्यापर्यंत बसगाड्या चालविण्यात येणार आहे. यासाठी टापरगाव येथे नियंत्रक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक संतोष नजन यांनी सांगितले.

 

Web Title: Aurangabad- taparagao start a bus