Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

औरंगाबाद : लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करायची असेल , हॉटेल्स खानावळ चालवायची असेल किंवा दारू विकायची असेल यासह सर्व अस्थापनांमधील कर्मचारी, कामगारांचे लसीकरण आवश्‍यक आहे. पेट्रोल पंपावरही लस घेतली आहे किंवा नाही हे तपासूनच पेट्रोल द्यावे अन्यथा संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश जारी केले.

गुरूवार (ता. २५) पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. राज्यात लसीकरणात जिल्हा मागे राहिल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी आता कंबर कसली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण ६४ टक्केच आहे. राज्यात लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा २९ व्या क्रमांकावर आहे. यामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर देणे सुरू केले आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. यात म्हटले आहे, दिवसभरात अनेक वेगवेगळे प्रवासी ऑटोरिक्षाने प्रवास करतात, यामुळे कोविड-१९ संसर्गाचा धोका अधिक आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्यासाठी ऑटो रिक्षा चालकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वांनी लसीचा किमान पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक आहे. अन्यथा वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून वाहन जप्त केले जाईल. ट्रॅव्हल्स एजन्सींनी प्रवाशांचे लसीकरण झाले असल्याची काऊंटरवरच खात्री करावी. लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच तिकीट देण्यात यावे. तसेच ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक, मालक, कर्मचा-यांचे सुद्धा लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील, या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यवाही पार पाडावी. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापनेतील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल.

कोणत्याही प्रकारच्या आस्थापनांमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करून अस्थापना सील केल्या जातील. या अनुषंगाने कामगार उपायुक्तांनी कार्यवाही पार पाडावी. तर अन्न व औषधी उपायुक्तांनी सर्व प्रकारच्या हॉटेल्स, खानावळी येथील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल, याची खात्री करावी. कोणत्याही प्रकारच्या हॉटेल्स, खानावळीमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास ती हॉटेल, खानावळ दंडात्मक कार्यवाहीसह सील करावी, असे आदेशात नमूद केले आहे. सर्व प्रकारच्या मद्य विक्री आस्थापनांमधील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल. कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्री करणाऱ्या आस्थानांमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास, सदर हॉटेल, खानावळ दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावी, असेही आदेशात नमूद आहे.

loading image
go to top