प्रमुख पक्षांमधील इच्छुक संभाजी ब्रिगेडच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक आखाड्यात संभाजी ब्रिगेड पक्षाने उडी घेतल्याने प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. संभाजी ब्रिगेडकडे 62 गटांत शंभर ते दीडशे इच्छुक उमेदवार असल्याने त्यांनी सर्वच गटांत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक आखाड्यात संभाजी ब्रिगेड पक्षाने उडी घेतल्याने प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. संभाजी ब्रिगेडकडे 62 गटांत शंभर ते दीडशे इच्छुक उमेदवार असल्याने त्यांनी सर्वच गटांत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच प्रमुख प्रस्थापित राजकीय पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवेसना, भाजपकडे इच्छुकांच्या उड्या पडलेल्या आहेत. एका गटात डझनभर इच्छुक उमेदवार आल्याने तिकीट वाटप जिकिरीचे झाले. शिवसेना-भाजपमध्ये युती झाली तर अनेक इच्छुकांचा पत्ता आपोआप कट होईल. यामध्ये सर्वच पक्षांकडून पत्ता कट झालेले काही मातब्बर उमेदवार संभाजी ब्रिगेडच्या दारी जाण्याची शक्‍यता असून, काही जणांनी पक्षाच्या नेत्यांकडे आतापासूनच संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. मराठा आरक्षणाची धग अद्यापही कायम आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर असतानाच संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. "शेतीमालाला हमीभाव, दारूमुक्त गाव' गाव हा अजेंडा ग्रामीण भागात अनेकांच्या पचनी पडला आहे. संभाजी ब्रिगेडने जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीसाठी मेळावे घेतलेले आहेत. ग्रामीण भागात बहुसंख्य असलेल्या मराठा मतांवरसुद्धा प्राधान्याने संभाजी ब्रिगेडचे लक्ष राहणार आहे.

सर्वाधिक फटका कोणाला?
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच संभाजी ब्रिगेडकडे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. सध्या पक्षाकडे शंभर ते दीडशे इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये मुलाखती घेऊन तिकीट दिले जाणार असले, तरी इतर पक्षांतील तगड्या, मातब्बर उमेदवारास तिकीट नाकारले गेल्यास त्यास संभाजी ब्रिगेडकडून तिकीट मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या राजकीय गणित, मतांचे समीकरण बदलू शकते. काही गटांत एखाद्या उमेदवारास कमी मतफरकानेसुद्धा पराभव स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडचा कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक फटका बसेल याचे तर्क लावले जाताना दिसतात.

एकाच चिन्हासाठी अर्ज
संभाजी ब्रिगेड राज्यातील निवडणुकीत उतरली असून, अपक्ष उमेदवारांच्या चिन्हामधील एकच चिन्ह सर्व उमेदवारांना देण्यात यावे. सर्व उमेदवार समान चिन्हावर लढतील यासाठी पक्षाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. औरंगाबादमध्येही सर्व उमेदवारांना एकच चिन्ह घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शेतमालाला हमीभाव, दारूमुक्त गाव हा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत. आमच्याकडे सर्व गटांत उमेदवार असून, कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. काही गटांत तर पाचपेक्षा जास्त इच्छुक आमच्याकडे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सर्व जागांवर उमेदवार असतील.
- रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

आम्ही जिल्हाभर उमेदवार देणार आहोत. आमच्याकडे उमेदवार असले, तरी इतर पक्षांतील नाराज, तिकीट नाकारणारे आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहोत.
- राहुल बनसोड, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Web Title: aurangabad zp & panchyat committee election