
Chhatrapati Sambhajinagar : `पंतप्रधान आवास`मध्ये होणार सहा हजार घरे
छत्रपती संभाजीनगर : वादग्रस्त ठरलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सहा हजार ८० घरे बांधली जाणार असून, पाच एप्रिलपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. तिसगाव-१, तिसगाव-२, सुंदरवाडी आणि पडेगाव अशा चार जागांसाठी चार स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
शहरात राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना वादग्रस्त ठरली आहे. सुरवातीला या प्रकल्पासाठी जागा वेळेत मिळाल्या नाहीत, म्हणून वाद झाला. नंतर जागा मिळाल्या पण दिलेल्या जागा चुकीच्या असल्याने व निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या निविदेनुसार १२८ हेक्टरमध्ये उभारला जाणार होता तर तब्बल ४० हजार घरांचा डीपीआर मंजूर होता. या कामाची निविदा समरथ कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेविषयी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत राज्य सरकारने चौकशी केली.
हर्सूल, पडेगाव, तिसगाव आणि सुंदरवाडी परिसरातील जागा घरे बांधण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल समितीने दिला. या अहवालानुसार पडेगाव वगळता इतर ठिकाणी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावीत, पडेगाव येथील काम दिलेल्या समरथ कंन्स्ट्रक्शनसोबत घराच्या किमती कमी करण्यासंदर्भात बैठक घ्यावी, असे आदेश राज्य शासनाने दिले.
दरम्यान या प्रकरणाला पुढे वेगळेच वळण लागले व कंत्राटदारांनी रिंग करून एकाच आयपी अॅड्रेसवरून निविदा प्रसिद्ध केल्याचे समोर आले. त्यानुसार समरथ कन्स्ट्रक्शनसह विविध कंपन्यांच्या १९ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे असतानाच शासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने सर्व जागांची पडताळणी करून ६०८० घरकुलांच्या प्रकल्पासाठी सोमवारी (ता. १३) निविदा प्रसिद्ध केल्या. तिसगाव-१, तिसगाव-२, सुंदरवाडी व पडेगाव या चार जागांवर २४.४९ हेक्टरवरील घरांच्या बांधकामासाठी चार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
या ठिकाणी होणार घरे
सुंदरवाडी गट नंबर ९ व १० : ०५.३८ हेक्टर (२०८० घरे)
तिसगाव गट नंबर २२५/१ : ०५.२९ हेक्टर (१०५६ घरे)
तिसगाव गट नंबर २२७/१ : १२.५५ हेक्टर (२४९६ घरे)
पडेगाव गट नंबर ६९ : ०१.२७ हेक्टर (४४८ घरे)