esakal | मेल्ट्रॉनमध्ये रुग्णाचा मृत्यू; महापालिकेची सुरुय लपवाछपवी

बोलून बातमी शोधा

aurangabad municipal corporation

प्रशासनातर्फे मात्र लपवाछपवी केली जात असून, घाटी रुग्णालयात नेताना रस्त्यात या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मेल्ट्रॉनमध्ये रुग्णाचा मृत्यू; महापालिकेची सुरुय लपवाछपवी
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये एका रुग्णाचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनातर्फे मात्र लपवाछपवी केली जात असून, घाटी रुग्णालयात नेताना रस्त्यात या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शहरातील कोरोनाबाधित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीनशे रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा: मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू; दिवसभरात वाढले सात हजार ४६८ कोरोनाबाधित

याठिकाणी सध्या तीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांसाठी याठिकाणी ऑक्सिजनची व्‍यवस्था आहे. पण अधिक प्रमाणात ऑक्सिजनची गरज असणाऱ्या गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयात रेफर केले जाते. मंगळवारी (ता. २०) एका रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज असल्याने व त्या प्रमाणात मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा काही मिनिटांत मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात लपवाछपवी केली जात आहे.

हेही वाचा: कधी थांबणार? माहेरहून 5 लाख आणले नाहीत म्हणून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले, की एका रुग्णाची काल प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात पाठविले जात होते. रस्त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनी देखील मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला.

बाहेर काहीही घडो

मेल्ट्रॉनमध्ये रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यांना घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत. इतर ठिकाणी हलविताना अनेक रुग्ण घाबरत आहेत. मात्र, प्रशासनातर्फे मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. रुग्णालयाच्या बाहेर पडल्यानंतर काहीही घडो... त्याच्याशी आपला संबंध नाही, असे फर्मान येथील डॉक्टरांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.