esakal | आडुळ: मुसळधार पावसाने नागरिक अडकले गावाबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

आडुळ: मुसळधार पावसाने नागरिक अडकले गावाबाहेर

आडुळ: मुसळधार पावसाने नागरिक अडकले गावाबाहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आडुळ : मेघगर्जनेसह ब्राम्हणगाव व ब्राम्हणगाव तांडा परिसरात बुधवारी (ता.२२) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे कामानिमित्त तांड्याबाहेर गेलेले नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या नागरिकांना ट्रॅक्टरच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढून तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर तांड्यावर पोहोचविण्यात आले.

हेही वाचा: औरंगाबाद: विवाहितेचा छळ, सासरकडील चौघांवर गुन्हा

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ब्राम्हणगावसह परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना मोठा पुर आला होता. त्यामुळे गावात येण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यालाच महापुराचे स्वरुप आल्याने गावाबाहेर गेलेल्या नागरीकांना गावात येता येत नव्हते. त्यामुळे या पुरात अडकलेल्या अंकुश राठोड, संजय राठोड, जामुवंत राठोड, कोमल राठोड, सिद्धेश्वर राठोड, नारायण जाधव, कल्याण राठोड, ऊर्मिला राठोड, कृष्णा चव्हाण, साई आढे, विशाल जाधव, शुभम राठोड यांच्यासह अनेक महिला, पुरुष दोन तास येथे अडकून पडले होते.

यानंतर याबाबत माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक व मालक गोकुळ मांगीलाल राठोड यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या महिला, मुलांसह नागरिकांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढून तांड्यात आणून सोडले. ब्राम्हणगाव तांडा व ब्राम्हणगाव या गावाला जोडण्यासाठी फक्त एकच रस्ता असून तोही नदीतून आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी येथील नागरीकांना घरी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, दार पाऊस झाला तर या तांड्याचा लगेच संपर्क तुटतो. परिणामी येथील ग्रामस्थांना गावाबाहेरच मुक्काम करावा लागतो.

जावई बापूचे नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण

तांड्यातील एक जावई रामेश्वर गणपत आडे हे पत्नी राधिका व मुलगा अजय (वय ७) यांच्यासोबत सासुरवाडीला (एम.एच-२१ बीएन-७६९०) दुचाकीने जात होते. अचानक रस्त्याला पूर आल्याने त्यांची दुचाकी वाहून जाऊ लागल्याने त्यांनी दुचाकी सोडून मुलाचा हात पकडून पोहत पत्नीसह पाण्यातून बाहेर आले. नशीब बलवत्तर म्हणून तिघांचे वाचले प्राण वाचले. नंतर काहीच अंतरावर जाऊन दुचाकी एका झुडपात जाऊन अडकल्याची घटना बुधवारी घडली.

"मी आडुळला कामानिमित्त आलो होतो. परत मी गावाकडे निघालो. मात्र, ब्राम्हणगावपर्यंत आलो तेव्हा जोराचा पाऊस सुरु झाला. परिणामी गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यालाच महापुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे गावात जाता आले नाही, शेवटी ट्रॅक्टर चालक मदतीला आला म्हणून आम्ही गावात सुखरूप पोहोचू शकलो."-यशवंत राठोड, ग्रामस्थ

loading image
go to top