esakal | अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी

बोलून बातमी शोधा

vaccine

अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता. २८) कोविन ऍपवर नोंदणी करता येईल. मात्र, या नागरिकांना मोफत लस मिळणार का? याविषयी अनिश्‍चितता आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक मेपासून केली जाणार आहे. पण, सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीची मारामार सुरू आहे. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांना लस देताना ती राज्य शासनाने खरेदी करावी, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. त्यामुळे लसीकरणाचा घोळ सुरू असताना बुधवारपासून लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: दिलासादायक! औरंगाबादेत प्रतिदिन रुग्णसंख्या १ हजारच्या आत; चौदाशे जण कोरोनामुक्त

या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत लसीकरणाच्या मोहिमेचे राज्याचे प्रमुख डॉ. डी. एम.पाटील यांनी मार्गदर्शन केले. याविषयी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यातून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. पण, बुधवारपासून नागरिकांना नोंदणी करता येईल.

हेही वाचा: पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैद्य विक्रीवरून अजित पवारांना पत्र

खासगी दवाखान्यांनी लस स्वत: खरेदी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्यास १८ वर्षांवरील नागरिकांना खासगी दवाखान्यात जाऊन लस घ्यावी लागू शकते, असा अंदाज डॉ. पाडळकर यांनी व्यक्त केला.