esakal | Ajanta Caves: जागतिक कलेचा आविष्कार अजिंठा लेणी टिकविण्याचे आव्हान

बोलून बातमी शोधा

Ajanta caves
Ajanta Caves: जागतिक कलेचा आविष्कार अजिंठा लेणी टिकविण्याचे आव्हान
sakal_logo
By
जितेंद्र जोशी

अजिंठा (औरंगाबाद): जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या शोधाला आज दोनशे दोन वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना महामारीमुळे मात्र हा दिवस साजरा करण्यास पर्यटकांना लेणीत प्रवेश नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ही ऐतिहासिक वास्तू आजही डौलात उभी असली तरी येणाऱ्या काळात हा अद्भुत ठेवा जपणे पुरातत्त्व विभागासमोरचे मोठे आव्हान आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २३ सप्टेंबर १८०३ रोजी असई येथे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले. या युद्धानंतर इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी मजबूत तटबंदी असलेल्या अजिंठ्याच्या भुईकोटातील बारादरीत आणले. तेव्हापासून कायमच इंग्रज अधिकाऱ्यांचा वावर अजिंठ्यात राहिला. वेळोवेळी लष्करी इंग्रज अधिकारी अजिंठ्यात येत गेले. अजिंठा जंगलात वाघांचा वावर असल्याने हे लष्करी अधिकारी उन्हाळ्यात खास शिकारीसाठी अजिंठ्यात डेरेदाखल असायचे.

हेही वाचा: Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

१८१९ मध्ये इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ हा अजिंठ्यात शिकारीनिमित्त उन्हाळ्याच्या सुट्या घालविण्यास आला होता. तो लेणापूर शिवारात शिकार करीत असताना वाघाच्या शोधात त्याला वाघूर नदीच्या पत्राशेजारी या लेण्यांचा शोध लागला अन् हा जागतिक कलेचा अद्भुत वारसा जगासमोर आला, तो दिवस होता २८ एप्रिल १८१९. आजही याच दिवशी जॉन स्मिथने लेणी क्र. १० मधील एका स्तंभावर आपल्या नावानिशी ही तारीख कोरलेली आढळते.

अजिंठा लेणी म्हणजेच महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवापैकी सर्वांत महत्त्वाचे वैभव ज्यात कला आणि सौंदर्य प्रतिबिंबित होते. एकूण २९ लेण्या अजिंठ्यात असून त्या बौद्धधर्मीय आहेत. पाच चैत्य व २४ विहार आहेत. ३० वी लेणी अर्धवट अवस्थेतच आहे.

हेही वाचा: चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली

या वैभवशाली वारसाला १९८३ मध्ये युनेस्को संस्थेने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यानंतर येणाऱ्या हौशी पर्यटकांनी लेणीतील भित्तिचित्रांचे अतोनात नुकसान केले. तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणाऱ्या अजिंठा लेण्यांमध्ये स्त्रीसौंदर्य आणि स्त्रीप्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वृद्ध, यक्षकिन्नर, पशुपक्षी, वृक्ष, लता, फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे चित्रही या लेणीत दिसून येतात. १८४४ मध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या चित्रकामासाठी नेमणूक झाली.

अजिंठा लेणीसारखा जागतिक वारसा टिकवणे काळाचे आव्हान आहे. यासाठी जतन व संवर्धन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.

-गजानन मंडावरे, (संरक्षण सहायक, भारतीय पुरातत्त्व विभाग, पुणे)

अजिंठा लेणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. कलेचा हा अद्भुत आविष्कार जगाला भुरळ घालणारा आहे. यापुढे हा वारसा टिकवणे मोठे आव्हान असेल.

-विजय पगारे (स्थानिक इतिहास संशोधक)