esakal | 'पारो'च्या समाधीची पडझड; स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने झटकले हात
sakal

बोलून बातमी शोधा

paro samadhi

'पारो'च्या समाधीची पडझड; स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने झटकले हात

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: मेजर रॉबर्ट गिलने अजिंठा लेण्यांचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला होता. गिलचे अजिंठा लेण्यांचा अभ्यास करताना पारो या स्थानिक युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे रॉबर्ट आणि पारो दहा वर्षे सोबत होते. दोघांचे आनंदी सहजीवन तथाकथित जातपुढाऱ्यांना खटकल्याने त्यांनी पारोचा विष पाजून खून केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावाही काही इतिहास संशोधन करतात. मात्र, तिची व्यथा एवढ्यावरच थांबली नाही. आज तिच्या स्मारकस्थळाची दुरवस्था झाली आहे. याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

कविवर्य ना. धो. महानोरांचे प्रयत्न-

महानोरांनी मागील वर्षी पारोची मोडकळीस आलेली समाधी पाहिल्यानंतर ती पुन्हा उभी करता येईल का अशी भावना व्यक्त केली होती. त्यास प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतील लोकांकडूनही यास प्रंचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच काही रसिकांनी, कलावंतांनी व काही संस्थांनी आम्ही पारोच्या समाधीच्या उभारणीला आर्थिक व संपूर्ण सहकार्य देतो असे प्रत्यक्ष फोन करून कळवले असल्याची माहिती कवीवर्य महानोरांनी फेसबूक पोस्टद्वारे दिली आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत नऊशे रुपयांत खासगी रुग्णालयात मिळतेय लस

दुसऱ्या बाजूला राज्याच्या पर्यटन विभागाचे या स्थळाकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आधिकाऱ्यांनीसुद्धा हे समाधी स्थळ आमच्या कक्षेत येत नसल्याचे सांगून टाकले आहे. तसेच स्थानिक प्रशासनही पारोच्या समाधीची डागडुजी करण्यास उत्साही दिसत नाही, ही माहिती कवी ना. धो. महानोरांच्या फेसबूक पोस्टमधून पुढे आली.

आपली प्रेयसीचे कायम स्मरण व्हावे, यासाठी गिलने अजिंठा गावाच्या दक्षिणेकडील दिल्ली गेट जवळ तिचे लहानसे सुंदर असे स्मारक उभारले होते. त्या स्मारकाच्या संगमरवरावर ‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो, व्हू डाईड २३ मे १८५६’ अशा दोन ओळी लिहून कृतज्ञतेची भावनाही रॉबर्ट यांनी व्यक्त केली आहे. पण, मृत्यूनंतरही या वनकन्येचा वनवास कायम आहे. तिच्या स्मारकाला अस्वच्छतेचा वेढा पडला. स्मारकाची दुरवस्था झाली. याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देऊन या स्मारकाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Beed Lockdown| बीडमध्ये ३१ मे पर्यंत कडक लॉकडाउन वाढवला

काही वर्षांपूर्वी या दोघांच्या प्रेमकथेवर ‘अजिंठा’ हा चित्रपट येऊन गेला. पारोच्या जातीविषयी अनेक विवाद झाले. पारोच्या स्मारकाची दुरवस्था दूर करण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेतला होता.

" महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा अशाप्रकारे दुरावस्थेत असणे वाईट आहे. स्थानिक प्रशासनासह राज्याचे पर्यटन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

-ना. धो. महानोर