महत्त्वाची बातमी: औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर अजित पवारांनी कापूस खरेदीला दिली गती

Ajit Pawar
Ajit Pawar

औरंगाबाद: ऑनलाईन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न केल्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यानुषंगाने दाखल याचिकेत खंडपीठाने १२ जूनपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडील असलेला कापूस खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकार, तसेच राज्याच्या पणन विभागाला दिले होते.

इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनी कापूस खरेदीत काही अडचणी असतील तर सातबारा घेऊन थेट खंडपीठात यावे या शब्दात दिलासाही दिला होता. या आदेशाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.१०) तातडीने राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली. 

यासंदर्भात अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर संबंधित बैठक घेतल्याचे बुधवारी सायंकाळी पोस्ट केले. त्यांनी पोस्ट केल्यानुसार ‘शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी, राज्यात शिल्लक एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

कापूस खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु

राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालयं शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुट्टीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यांतील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीत करण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून व्यवस्था करणार आहेत. कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीत जागा उपलब्ध होण्यासाठी जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत सध्या असलेले कॉटन सीड्‌स्‌ व बेल्‌स्‌चा उठाव मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत असलेल्या कॉटन सीड्‌स्‌चा लिलाव तातडीनं करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही श्री. पवार यांनी जाहीर केले. 

सीड उचलण्याचा कालावधीही १५ वरुन १० दिवसांवर

सीड्‌स्‌ उचलण्यासाठी असलेला १५ दिवसांचा कालावधी १० दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय लिलाव झाल्यानंतर जिनिंग फॅक्टरीतून सिड्‌स्‌ची उचल विहित वेळेत न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय बैठकीत झाला आहे.

राज्यात २०१९-२० मध्ये उत्पादित एकूण ४१० लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि त्यांच्या वतीनं कापूस पणन महासंघानं आत्तापर्यंत १८८ लाख १७ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी सुमारे १९८ लाख क्विंटल कापूस खरेदी केल्यानं राज्यात एकूण ३८६ लाख १७ हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. २३ लाख ८३ हजार क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक असून एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचं नियोजन करण्यात आल्याचे श्री. पवार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com