esakal | औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ‘मद्यपीराज’!
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानक

बेकायदा दारुची दुकाने बोकाळली आहेत, मोठ्या प्रमाणावर अवैध दारुही विक्री केली जात आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार, श्रमिक राहतात. दारुच्या दुकानांमुळे येथे व्यसनाधिनतेचा विळखा पडलेला आहे.

औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ‘मद्यपीराज’!

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्थानक Mukundwadi Railway Station आणि परिसरामध्ये गुंडागर्दी वाढली आहे. रेल्वेस्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या स्टेशनवर रात्री दारुच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींच्या त्रासाने परिसरातील महिला वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे तातडीने पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.दक्षिण-मध्य रेल्वेकडून मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सध्या मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाला तर विविध समस्यांनी विळखा घातला आहे. येथे रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने मद्यपी, गुंडांचे राज सुरु होते. रेल्वेस्थानकात अंधाराचा फायदा घेत दारुच्या पार्ट्या रंगत आहेत. या मद्यपींना रोखण्याचा प्रयत्न केल्यास चाकूचा धाक दाखवला जातो. या ठिकाणी चाकू हल्ला होणे हा प्रकार नवीन राहिलेला नाही. खुनाच्याही घटना घडलेल्या आहेत. बेकायदा दारुची दुकाने बोकाळली आहेत, मोठ्या प्रमाणावर अवैध दारुही विक्री केली जात आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार, श्रमिक राहतात. दारुच्या दुकानांमुळे येथे व्यसनाधिनतेचा विळखा पडलेला आहे. रेल्वेच्या जागेवर सर्रास अतिक्रमणे असतानाही रेल्वेचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाला रेल्वे सुरक्षा दल आणि मुकुंदवाडी पोलिसांची हद्द आहे. स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान Railway Protection Force चक्कर मारण्यापुरती गस्त घालतात, तर स्टेशनच्या बाहेरचा परिसर मुकूंदवाडी Aurangabad पोलिसांचा आहे. मात्र पोलिसांची पुरेशी गस्त नसते. त्यामुळे या भागात तातडीने पोलिस चौकी सुरु करावी, दारुचे धंदे बंद करावेत, अधिकृत दारुची दुकाने दुसरीकडे हलवावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.Alcoholic Persons Around Mukundwadi Railway Station In Aurangabad

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, अनेक जण जखमी

काय म्हणतात महिला?

गुंडागर्दी वाढली

उषा धनवई : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाच्या अवतीभोवती गुंड प्रवृत्तीचे लोक आणि मद्यपींचा वावर आहे. महिलांना पाहून विक्षिप्त चाळे करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात तातडीने पोलिस चौकी सुरु करण्याची गरज आहे.

चाकुहल्ल्याची भीती

सरला वाघ : रेल्वेस्थानकात रात्रीच्या अंधारात वेगवेगळ्या ठिकाणी मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. विशेष म्हणजे जो कुणी विचारेल त्याला चाकूचा धाक दाखविला जातो, प्रसंगी चाकू हल्लाही केला जातो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पोलिस चौकी सुरु केली पाहिजे.

रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण

छबू गायकवाड : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूने रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने रेल्वेची जमीन धोक्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने दोन्ही बाजूने भींती उभारुन जागा संरक्षीत केली पाहिजे.

अवैध व्यवसाय बोकाळले

लिलाबाई निकम : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंनी अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. रस्त्यावरुन जाताना केंव्हाही हातातील मोबाईल हिसकावणे, पर्स पळवणे, दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.

हेही वाचा: राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?

रस्त्याची समस्या

अरुणा जैस्वाल : कामगार चौकातून रेल्वेस्टेशन पर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. डांबरी रस्ता शिल्लक नसल्याने चिखलातून मार्ग काढताना दमछाक होत आहे. त्यामुळे डांबरी रस्ता तयार केला पाहिजे.

अंधाराचे साम्राज्य

कल्पना टेंबरे : रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक लाईट बंद आहेत. स्थानकातीही अंधाराचे साम्राज्य असल्याने महिलांना रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडता येत नाही. मद्यपींचा सतत वावर असल्याने महिला व मुलींना फिरणे मुश्कील झाले आहे.

loading image