Aurangabad : आंध्रातील विद्यापीठाच्या नावाचा चेक देऊन १० लाखांना चुना

खऱ्या आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
fraud
fraudesakal

औरंगाबाद : कोणताच पुरावा मागे न सोडता बॅंकेत आंध्रातील विद्यापीठाच्या नावाने बनावट धनादेश दाखल करून तब्बल १० लाखांची फसवणूक करण्यात आली. एखादा चित्रपट, वेबसिरीजला शोभेल असा हा खळबळजनक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने फसवणूक करताना आंध्रातील विद्यापीठाच्या नावाने दिलेला धनादेश, बॅंकेत खाते उघडण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, घरमालकाच्या नावाने केलेला भाडेकरारनामा हे सर्वच बनावट असल्याचे समोर आले आहे.

तूर्तास बॅंक विधी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून विद्यापीठाला १० लाखांचा चुना लावणाऱ्याच्या आधार कार्डवरून त्यावरील नावाने जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शुभम प्रकाश भिवसाने (रा. बन्सीलालनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधणे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी सहकारनगर, न्यू उस्मानपुऱ्यातील युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंकेचे विधी अधिकारी कपिल विजयसिंग बिलवाल (३५, रा. आदर्श कॉलनी, गारखेडा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार १० जूनला शुभमने बॅंकेत ऑनलाइन खाते उघडले होते.

शुभम भिवसानेच्या आधारकार्डवर जी /०७, मारवाडी चाळ, बुद्धकलनी, एम.डी. रस्ता, साई बाबा मंदिरासमोर, मुंबई उपनगर असा पता नमुद आहे. त्याला औरंगाबादेतील शाखेत खाते उघडावयाचे असल्याने त्याने ऑनलाइन फॉर्म भरताना फ्लॅट क्र. २४, स्मृती अपार्टमेंट, बन्सीलालनगर असा पत्ता देऊन त्यासाठी घरमालक योगेश पांडुरंग जाधव, यांच्यासोबत झालेला भाडेकरारनामा आणि त्यासोबत जाधव यांच्या नावाचे वीजबिल जोडले होते. दरम्यान त्याचे बचत खाते उघडण्यात आले.

शुभमने १० ऑगस्टला युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा रिंगरोड बँक, विजयवाडा या बँकेत खाते असलेल्या एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, विजयवाडा आंध्रप्रदेश यांच्या नावाचा ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा ओन्ली अकाउंट पेयी धनादेश वटविण्यासाठी औरंगाबादेतील सदर शाखेत टाकला. त्याच दिवशी बॅंकेकडून सदर रक्कम शुभमच्या खात्यात जमा झाली. १७ ऑगस्टला विजयवाड्यातील सदर बॅंकेचे व्यवस्थापक अशोक आनंद यांनी फोन करून शुभम याने दिलेला सदर धनादेश हा संबंधित विद्यापीठाने इश्‍यू केलाच नसल्याचे सांगितले. तसेच तो धनादेश बनावट आणि खोटा असून संबंधित विद्यापीठानेही सदर धनादेशासंदर्भात विजयवाडातील बॅंकेला मेलवर २० ऑगस्टला पाठविलेले पत्र औरंगाबादेतील बॅंकेला देण्यात आले.

...अन् बॅंक अधिकाऱ्यांनी गाठले शुभमचे घर

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर औरंगाबादेतील बॅंक अधिकाऱ्यांनी शुभमने दिलेल्या फ्लॅट क्र. २४, स्मृती अपार्टमेंट, बन्सीलालनगर या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता बॅंक अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. घरमालक जाधव यांनी त्यांचे शुभम भिवसाने याच्याशी कोणतेही संबंध नाहीत, तसेच आपण शुभम भिवसानेला ओळखतही नाही, याशिवाय आपण त्या व्यक्तीशी कोणताही भाडेकरार केला नसून सदर भाडेकरारावरील स्वाक्षरीही आपली नसून खोटी असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांना सांगितले.

चुना लावल्याचे स्पष्ट होताच पोलिसांत धाव

शुभमने खोटी कागदपत्रे दाखल करत बँकेत खाते उघडून सदर विद्यापीठाच्या नावाने खोटा धनादेश बनवून ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा चुना लावल्याचे स्पष्ट होताच बॅंकेचे विधी अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला. हा प्रकरणामुळे सदर रक्कम आता बॅंकेला संबंधित विद्यापीठाला द्यावी लागणार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बॅंक प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार देण्याचे ठरल्यानंतर बॅंक प्रतिनिधी म्हणून विधी अधिकारी बिलवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक दिलीप चंदन करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com