Asia Book of Records : ६ हजार ५०० किलो खिचडीची एशिया बुकमध्ये नोंद

सेलेब्रिटी शेफ विष्णु मनोहर आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या योगदानातून संपन्न झालेल्या या विक्रमी खिचडीची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली.
Asia Book of Records khichadi
Asia Book of Records khichadisakal

छत्रपती संभाजीनगर - १५०० किलो वजनाची १० बाय १० फुटाची भक्कम कढई, प्रत्येकी १०० किलोहून जास्त साहित्याचा वापर, साहित्याचे २३ प्रकारचे साहित्य, १०० विद्यार्थी आणि स्वतः शेफ विष्णू मनोहर आणि टीमची सलग तीन- साडेतीन तासांच्या मेहनतीचा परिपाक म्हणजे ६ हजार ५०० किलो मिक्स व्हेजिटेबल खिचडी.

सेलेब्रिटी शेफ विष्णु मनोहर आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या योगदानातून संपन्न झालेल्या या विक्रमी खिचडीची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी एमजीएम कँम्पसमध्ये एकच गर्दी झाली होती.

गुरुवारी सकाळी ६ वाजता एमजीएम क्लोव्हरडेल, स्कुल ग्राउंड, एमजीएम विद्यापीठ परिसर येथे खिचडी बनवायला सुरूवात झाली. विक्रमी खिचडी बनताना पहाटे सहापासूनच खवय्ये, हौशींनी कँम्पसमध्ये गर्दी केली होती.

प्रत्येकी २०० किल़ो मूग डाळ, तूर डाळ, शेंगदाणे, प्रत्येकी १०० किलो चना डाळ, मीठ, साखर, प्रत्येकी २०० किल़ो मूग डाळ, तूर डाळ, शेंगदाणे, प्रत्येकी १०० किलो चना डाळ, मीठ, साखर, एक हजार किलो तांदूळ, प्रत्येकी ३०० किलो फुलगोबी, गाजर, कांदे, २२५ लीटर तेल, कसुरी मेथी, अद्रक आदी साहित्य वापरून केवळ लाकडाच्या निखार्यावर खिचडी तयार करण्यात आली. तत्पूर्वी अन्नपूर्णेची पुजा करूनच विष्णू मनोहर यांनी पाककृतीला सुरुवात केली.

सात- आठ किलो भीमसेनी कापूर टाकून लाकड जाळण्यात आली. आपल्या शहरात होणाऱ्या या विक्रमाची साक्षीदार होताना महिला प्रत्येक साहित्य आणि कोणते साहित्य कधी टाकले याची नोंद ठेवत होत्या. विष्णू मनोहर यांनी टप्प्याटप्प्याने साहित्य घातले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खिचडी तयार होत होती.

जवळपास २० किलो वजनाचे उलथणे हातात घेऊन खिचडी हलवण्याचा मोह उपस्थितांना आवरता नव्हता. विष्णू मनोहर यांच्या समवेत उभे राहून प्रत्येकानी आपली ही हौस भागवली. लोखंड आणि स्टीलची भव्य कढई नागपूर क्रेनवरून मागवण्यात आली होती. विष्णू मनोहर यांची ही कढई सुद्धा आकर्षण ठरली. विष्णू मनोहर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे मानद प्राध्यापक असल्याने विद्यार्थीही या अनोख्या प्रयोगासाठी राबत होते.

खिचडी तयार झाल्यानंतर या खिचडीची ' एशिया बुक अॉफ रेकॉर्डर्स'मध्ये नोंद झाल्याची घोषणा एशिया बुक अॉफ रेकॉर्डसच्या प्रतिनिधी रेखा सिंग यांनी केली. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव आशिष गाडेकर, एशिया बुक अॉफ रेकॉर्डसचे नागेंद्र सिंग, डॉ. विजया देशमुख, डॉ. रेखा शेळके, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमुख कपीलेश मंगल उपस्थित होते.

खिचडी बनवण्यासाठी लागणारे सरपणाच्या चौपट रोपटी लावले जातील असे एमजीएमच्या वतीने जाहीर झाली. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे सहाय्यक प्रा. वैभव जोशी आणि डॉ. पुष्पा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

जिथे कढई तिथे आम्ही !

'जिथे कढई तिथे आम्ही!' म्हणत शेफ विष्णू मनोहर यांच्या विक्रमामध्ये त्यांची टीम सहभागी असते. खिचडी बनवताना टीम प्रत्येक साहित्याकडे खिचडीत टाकले जावे, निखारा नीट पेटता रहावा याची पुरेपूर काळजी घेत होते. विष्णू मनोहर यांचे बंधू प्रवीण मनोहर, गौरव दुवेदी, आकाशमंगल क्षीरसागर, चेतन चोटपगार, अजय सदर यांचा यात समावेश होता.

संस्थांना खिचडी वाटप

ही खिचडी एमजीएम कँम्पससह मातोश्री वृद्धाश्रम, शासकीय निरीक्षणगृह, बाबासाई एडसग्रस्त बालगृह, भगवानबाबा बालिकाश्रम, स्नेह सावली सेंटर, साई वृद्धाश्रम, शोभना बालगृह, ग्लोबल फाऊंडेशन, चौधरी फाऊंडेशन, रॉबिनहूड आर्मी, रोटी बँक, हर्ष नगर मित्र मंडळ, आधार वृद्धाश्रम, उदयन शालिनी ग्रुप, सुरडकर वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात आली.

प्रतिक्रिया

सर्वात जास्त पदार्थ वापरून तयार झालेली खिचडी सर्वात जास्त लोकांना सर्व्ह करताना विष्णू मनोहर यांनी कमाल केली. खिचडीचा विक्रम बघण्यासाठी मी उत्सुक होते. मिक्स भाज्या, डाळी वापरून तयार होणारी खिचडी चविष्ट आणि 'वन डिश' पदार्थ आहे. एशिया बुक अॉफ रेकॉर्डसमध्ये दरवर्षी व्हिएतनाममध्ये सगळे तज्ज्ञ येऊन आपापले विक्रम सांगतात आणि ते मोडण्यासाठी प्रयत्न करतात. पण आज झालेला विक्रम मोडू नये वाटते.

- रेखा सिंग, प्रतिनिधी, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

आपल्या शहरात विक्रमी खिचडी बनणार होती. हे समजताच आम्ही कार्यक्रमाला आलो. आपल्या शहरात पहिल्यांदाच हा प्रयोग झाला. या विक्रमाची नोंद होताना पाहण्याचा मोह आवरत नव्हता.

- नीता महाजन

विक्रमी ६ हजार ५०० किलो खिचडी आमच्या कँम्पसमध्ये तयार होणे ही खरोखरच गौरवाची बाब आहे. उपलब्ध साधनांमध्ये संसाधने कशी वापरावी, वेळेचे नियोजन, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदार्थ तयार करण्यासाठी करावे लागणारे परिश्रम, नियोजन, टीमवर्क आणि कौशल्यांचा अचूक उपयोग कसा करावा याचा पुरेपूर अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना आला.

- डॉ. विलास सपकाळ, कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ

छत्रपती संभाजीनगर माझे आवडते शहर आहे. या शहरात येणे, इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणे मला खूप आवडते. खिचडीला भारताची अधिकृत डिश म्हणून मान्यता मिळावी यासाठी मी हा प्रयोग केला. येत्या २२ जानेवारीला अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त मी तिथेही ५ हजार किलो शिरा याच कढईत करणार आहे.

- शेफ विष्णू मनोहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com