Aurangabad : सोयरीक जुळविताना विचारणा!

तुमच्याकडे स्वच्छतागृह आहे का?
Auranagabad toilet Management
Auranagabad toilet Management

औरंगाबाद : मानवी मलमूत्राचे व्यवस्थापन ही देशापुढील आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. जवळजवळ ६० टक्के आजार केवळ मानवी मलमूत्रामुळे होणाऱ्या माती व पाण्याच्या प्रदूषणामुळे पसरतात. साहजिकच मानवी मलमूत्राद्वारे होणारे हे प्रदूषण टाळणे महत्त्वाचे आहे. यामुळेच शौचासाठी उघड्यावर जाऊ नये, स्वच्छतागृहाचा वापर करावा यासाठी १९९९ पासून महाराष्ट्रात ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातून’ व्यापक चळवळ उभी राहिली आहे. यानंतर ‘निर्मल ग्राम अभियाना’ने ही चळवळ पुढे नेली.

सार्वजनिक स्वच्छतेसाठी शिस्त लावण्यासाठी सुरू झालेल्या या अभियानामुळे आज अनेकांना स्वच्छतागृह वापरण्याची सवय लागली आहे. विशेष म्हणजे, सोयरीक जुळवितानाही ‘मुलाकडे स्वच्छतागृह आहे का?’ अशी विचारणा होत आहे. अभियानांनी शहरी आणि व ग्रामीण महाराष्ट्राची बदललेली मानसिकता हे मोठे यश मानले जात आहे.

उघड्यावरील शौच ही समस्या ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात सारख्याच प्रमाणावर गंभीर आहे. अस्वच्छतेमुळे शहरातील गरीब वस्तीतील रहिवाशांना सारखे आजारपण येते आणि अशा आजारांमुळे त्यांना औषधोपचाराच्या खर्चाचा बोजा सहन करावा लागतो. तसेच घरच्या लक्ष्मीला बाहेर उघड्यावर शौचसाठी बसावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे.

यामुळे लग्न करून सासरी जाण्यापूर्वी मुलगी व तिचे आई-वडील मुलांकडच्यांना विचारतात की तुमच्याकडे स्वच्छतागृह आहे का? सोयरीक जुळवताना अशी विचारणा होऊ लागली, हा मोठा सामाजिक बदल मानला जात आहे. स्वच्छतागृह असेल तरच मुलगी लग्नासाठी तयार होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत व घडत आहेत. अभियान संपत आले तरी स्वच्छतागृह वापरण्याची लागलेली सवय सार्वजनिक स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, हिंदी चित्रपट ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ अन् मराठी चित्रपट ‘येड्याची जत्रा’ यासह अनेक चित्रपट, लघुपट या माध्यमातून स्वच्छतागृह वापरण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना स्वच्छतागृह वापरण्याची शिस्त लागावी यासाठी ‘गुड मॉर्निंग पथक’द्वारे गुलाबाचे फूल देऊन केली जाणारी गांधीगिरी असो की आर्थिक दंड असो यासह माध्यमातून स्वच्छतागृह वापरण्याची शिस्त लावण्यात आली. नुकताच १९ नोव्हेंबरला जिल्ह्यात ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक गावातील नागरिकांनी आपल्या घरातील शौचालयांना तोरण, रांगोळी तसेच काहींनी तर केक कापून शौचालय दिन साजरा केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात ‘शौचालय मोहीम’, ‘निर्मल भारत अभियान’ या माध्यमातून स्वच्छतेचे प्रयोग करण्यात आले आहेत.

आर्थिक स्रोत निर्माण करावा

सार्वजनिक स्वच्छतागृह केवळ बांधून चालणार नाही तर त्याचा नियमित वापर व्हायला हवा. तालुका व गावस्तरावर असलेल्या मोठ्या बाजाराच्या गावांमध्ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय बांधून शौचालयाच्या वापरातून आर्थिक स्रोत निर्माण करावा. सार्वजनिक शौचालये मोठ्या ग्रामपंचायती, बाजारपेठेची गावे, सार्वजनिक ठिकाणी, तरंगती लोकसंख्या, यात्रा स्थळ, अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात यावीत. यासाठी एका सार्वजनिक स्वच्छता संकुलासाठी २ लाख १० हजारापर्यंतच कमाल खर्च शासनाकडून देण्यात येतो.

जिल्ह्यात सार्वजनिक

स्वच्छतागृहांची स्थिती (२०२१ ते २०२३)

  • सार्वजनिक स्वच्छतागृहे ः ४८७

  • काम पूर्ण झालेली स्वच्छतागृहे ः ३०७

  • काम प्रगतिपथावर असलेली ः १८०

  • स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदानाचे वाटप- ७ कोटी २७ लाख ५० हजार. (यातील ९२ सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी जागतिक बँकेकडून २ कोटी ७६ लाख रुपये तर उर्वरित २१५ साठी ४ कोटी ५१ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.)

  • सर्व निधी संबंधित पंचायत समितीला वर्ग करण्यात आलेला आहे.

आता जिल्ह्यात स्वच्छतागृह वापरण्याची अनेकांना सवय लागली आहे. मात्र, ग्रामीण भागापुढे आता सांडपाणी, व्यवस्थापन व प्लॅस्टिक निर्मूलन या समस्या आल्या आहेत. या सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गावातील तरुण पिढीने यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, आपले गाव आपण स्वच्छ ठेवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार गावाचा चेहरा-मोहरा बदलून टाकेल.

-राजेंद्र देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com