esakal | औरंगाबाद : शहरातील ३२ बेघरांना मिळाला निवारा
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील ३२ बेघरांना मिळाला निवारा

शहरातील ३२ बेघरांना मिळाला निवारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : बसस्थानक, रेल्वेस्टेशन, शहरातील उड्डाण पुलांखाली राहणाऱ्यांसाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केली आहेत. बुधवारी (ता. सहा) रात्री महापालिकेने शहराच्या विविध भागात बेघरांचा शोध घेऊन ३२ जणांना निवारागृहात आसरा दिला. त्यात एका कुटुंबाचा देखील समावेश आहे.

प्रशासक आस्तिककुमार पांडे यांच्या आदेशानुसार बुधवारी रात्री नऊ ते दीड वाजेपर्यंत बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यासाठी उपआयुक्त सौरभ जोशी स्वतः कर्मचाऱ्यांना घेऊन फिरले. त्यात ३२ जण आढळून आले. त्यांना विविध बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. मोहिमेत प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे, निवारा देखभाल व व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी प्रशांत दंदे, प्रशांत गायकवाड, फारुख पटेल, संजय देवतवाल, अनिकेत देवतवाल, छाया लंबे, लता पागोरे, संगीता पागोरे यांनी पुढाकार घेतला.

हेही वाचा: पावसामुळे शेतीची माती, ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळे

सिडको एन-६, मोती कारंजा, गांधीनगर, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा या ठिकाणी बेघर निवारागृह आहेत. त्यात २८९ जणांची राहण्याची व्यवस्था आहे तर सध्या २१४ जण राहतात. चिकलठाणा येथील केंद्र फक्त महिलांसाठी आहे, असे सौरभ जोशी यांनी सांगितले.

रात्रीच्यावेळी कोणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी अनेक जण या केंद्रात येत नाहीत. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावले जाणार आहेत. बेघरांची माहिती नागरिकांनी महापालिकेला कळवावी, यासाठी फोन नंबर या फलकावर दिले जाणार आहेत, असे श्री. जोशी यांनी सांगितले.

loading image
go to top