पाडापाडीसाठी प्रशासन सज्ज | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडापाडीसाठी प्रशासन सज्ज

औरगाबाद : पाडापाडीसाठी प्रशासन सज्ज

औरगाबाद : विश्‍वासनगर लेबर कॉलनीतील पाडापाडीच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी रविवारी (ता.१४) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथील शासकीय निवासी इमारती जीर्ण झाल्याने त्या पाडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली असून पुढील कार्यवाहीबाबत लवकरच आदेश दिले जातील असे सांगितले.

सुरवातीला वीज, पाणी बंद करून इमारती रिकाम्या करून घेतल्या जाणार आहेत तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर घाटी रुग्णालयात वॉर्ड व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासन पाडापाडीवर ठाम असल्याने येथील रहिवाशांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागात विकासकामांचा धडाका

लेबर कॉलनीतील रहिवाशांना बाहेर काढून शासकीय निवासस्थाने रिकामी करून धोकादायक बनलेल्या इमारती पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी रविवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंदार वैद्य, पोलिस उपायुक्त उज्ज्वला बनकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत इमारती पाडण्याबाबत केलेल्या पूर्वनियोजनाची माहिती घेतली, बैठकीत विविध १७ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी कोणती कामे करायची त्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये विद्युत पुरवठा खंडित करून महावितरणाची यंत्र सामग्री, मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पथक प्रमुख म्हणून महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता (शहर) यांची नियुक्ती केली आहे. दूरध्वनी पुरवठा खंडित करून यंत्र सामग्री, मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक, पाणीपुरवठा बंद करून तिथली यंत्रसामग्री, मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा: जळगाव : दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील वॉर्ड, आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवण्याबाबत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नकाशा तयार करून निवासस्थाने पाडण्याची कार्यवाही करण्यापूर्वी तेथील नागरिकांना घराबाहेर काढून ताबा घेण्याची व आवश्‍यक ती वाहने, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

तात्पुरता दिलासा

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करून लेबर कॉलनीतील जीर्ण झालेली शासकीय घरे पाडापाडीची कारवाई काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. त्यामुळे तूर्तास कारवाई टळली असली तरी येत्या काही दिवसांत मोहीम होणार हे अटळ असल्याचेही संकेत प्रशासनाने दिले आहेत. सोमवारी मोहीम सुरू होणार तोच राज्यात त्रिपुरा येथील हिंसेचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी करण्यात येणारी पाडापाडीची कारवाई काही दिवसांसाठी स्थगित केल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top