esakal | वैजापुरात कोरोनाचा रुग्ण दगावला, परवानगी नसताना डाॅक्टराने केले उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

वैजापुरात कोरोनाचा रुग्ण दगावला, परवानगी नसताना डाॅक्टराने केले उपचार

वैजापुरात कोरोनाचा रुग्ण दगावला, परवानगी नसताना डाॅक्टराने केले उपचार

sakal_logo
By
गणेश पिटेकर

वैजापूर (जि.औरंगाबाद) : शहरातील लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलमध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्या प्रकरणी डाॅ. गणेश अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच रस्त्यावरील त्यांच्या लहान बंधूंच्या आधार हाॅस्पिटलमध्ये 12 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतानाही हा रुग्ण दवाखान्यात दाखल करून घेतलाच कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील लाडगाव रस्त्यावरील डाॅ. ईश्वर अग्रवाल यांच्या आधार हाॅस्पिटलमध्ये ता.१२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णास उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर दवाखान्याचे संचालक डॉ.ईश्वर अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कामगारांनी अत्यंत गोपनीय व शिताफीने मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान शहरातील कोणत्याही दवाखान्यास कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नसतानाही डॉ.अग्रवाल यांनी या रुग्णास दाखल करून कसे घेतले? याशिवाय या दवाखान्यात एम.डी.फिजिशियन डाॅक्टर नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे अधिकार त्यांना कुणी दिले? रुग्ण दगावून २४ तासांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला. परंतु दगावलेल्या रुग्णाची माहिती आरोग्य विभाग, महसूल प्रशासन व पोलिस ठाण्यात का कळविण्यात आली नाही? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आधार हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी तर नाहीच. याशिवाय दवाखान्यात पीपीई किट, रुग्णांसाठी विलगीकरणाची व्यवस्था, उपचार करणारा स्वतंत्र कर्मचारी वर्ग, डाॅक्टर उपलब्ध असणे बंधनकारक आहे. परंतु डॉ. अग्रवाल यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सिद्ध झाले. एवढेच नव्हे मृत पावलेला रुग्ण हा कोरोना बाधितच होता. असेही ते सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे आधार हाॅस्पिटलच्या डाॅ. ईश्वर अग्रवाल यांच्याविरुद्ध प्रशासन काय कारवाईचा बडगा उगारते. हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे.

आरोग्य विभागाचे अधिकारी गाफील : शहरातील हाॅस्पिटलमध्ये खुलेआमपणे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असताना आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र अजूनही गाफील आहेत. आधार हाॅस्पिटलमध्ये कोरोनाचा रुग्ण दगावून २४ तासांपेक्षाही जास्त कालावधी उलटूनही याबाबतची भणक आरोग्य विभागासह महसूल प्रशासनाला नाही. हे विशेष.

शहरातील कोणत्याही खासगी दवाखान्यांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. परवानगीसाठी शासनाने निकष घालून दिले आहेत. आधार हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती माझ्यापर्यंत अजून आली नाही. त्यांनी माहिती कळवायला पाहिजे होती. परंतु असे झाले असेल तर संबंधित डाॅक्टरविरुध्द कारवाई अटळ आहे.

- डाॅ. गजानन टारपे, वैद्यकीय अधीक्षक, वैजापूर

अग्रवाल बंधूंच्या अडचणीत वाढ : कोरोना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डाॅ. गणेश अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी डाॅ. ईश्वर अग्रवाल यांच्या दवाखान्यातील फिजिशियन कक्ष रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता कोरोना रुग्ण दवाखान्यात दगावल्याने डाॅ. ईश्वर अग्रवाल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एकंदरीत डाॅ. अग्रवाल बंधूंच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.