esakal | कचरा डेपोच्या धुराने गुदमरताहेत जीव, आगीचे सत्र सुरूच

बोलून बातमी शोधा

ठाणे ः दिवा डम्पिंग ग्राऊंडला मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भीषण आग लागल्याने परिसर धुराने भरून गेला होता. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे दिवावासीय हैराण झाले आहेत.(छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
कचरा डेपोच्या धुराने गुदमरताहेत जीव, आगीचे सत्र सुरूच
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेचा पडेगाव येथील कचरा डेपो कार्यान्वित झाल्यानंतरही आगीच्या घटना सुरूच असून, शुक्रवारी (ता. २३) लागलेली आग अद्याप धुमसत असल्याने धुराने नागरिकांची घुसमट वाढली आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडणे अवघड झालेले असताना घरात बसलेल्या नागरिकांवर गुदमरून मरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेविरोधात पुन्हा एकदा रोष व्यक्त केला जात आहे. पडेगाव परिसरातील कचरा डेपोला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. प्रत्येकवेळी कचरा डेपो सुरू झाल्यानंतर नागरिकांना कुठलाच त्रास होणार नाही, असे आश्‍वासन महापालिका व पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. पण कचरा डेपो सुरू झाल्यानंतरही नागरिकांचा त्रास संपलेला नाही. आधी दुर्गंधीमुळे तर आता धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात उन्हाळा सुरू झाला की कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. शुक्रवारी दुपारी कचरा डेपो लगत महापालिकेने साठवून ठेवलेल्या कचऱ्याला मोठी आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पण शनिवारी पुन्हा ढिगाऱ्यातून धूर निघण्यास सुरुवात झाली. पुन्हा एकदा अग्निशमन विभाग धावून गेला पण सोमवारी सकाळपर्यंत धूर सुरूच होता. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. धुरामुळे अनेकांना घरात बसणे देखील अवघड झाले आहे. डोळ्यांची आग होणे, श्‍वास गुदमरणे, असा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन याठिकाणी आता पाण्याची सोय करण्यात आली आहे, असे घन कचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

आग लागते की लावली जाते?

प्रकल्प सुरू होण्यापूर्वी महापालिकेने लाखो टन कचरा परिसरात जमा करून ठेवला आहे. या कचऱ्याची अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. हा कचरा नष्ट करण्यासाठीच आग लावली जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.