esakal | शिवसेनेच्या खेळीने भाजप घायाळ! माजी आमदार नितीन पाटील यांनी बांधले शिवबंधन
sakal

बोलून बातमी शोधा

Ex MLA Nitin Patil Join Shiv Sena

या अगोदर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने भाजपला पहिला धक्का बसला. आता जिल्हा बँकेवर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या खेळीने भाजप घायाळ! माजी आमदार नितीन पाटील यांनी बांधले शिवबंधन

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार नितीन पाटील यांनी गुरुवारी (ता.एक) मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेत भाजपला दुसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. या अगोदर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने भाजपला पहिला धक्का बसला. आता जिल्हा बँकेवर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे.


गुरुवारी (ता.एक) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नितीन पाटील यांना शिवबंधन बांधण्यात आले. तेव्हा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर यांची उपस्थिती होती. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला सोबत घेत शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. नितीन पाटील हे भाजपमध्ये असल्याने त्यांना अध्यक्ष कसे करायचे असा प्रश्‍न होता. यावर नितीन पाटील यांनाच शिवसेनेत घेण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष शिवसेनेचा होणार एवढे निश्चित.


औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेने राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाजूला सारत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सोबत घेतले होते. यावरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? असा सवाल करत खैरे यांनी थेट काँग्रेसच्या पॅनलचा प्रचार केला होता. परंतु, शिवसेनेने भाजपला सोबत घेऊन तयार केलेल्या शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत बहुमत मिळविले होते. निवडणुकीआधी सत्तार, बागडे, भुमरे या पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी नितीन पाटील हेच बॅंकेचे अध्यक्ष असतील असे जाहीर केले होते. निकाल लागला तेव्हा भाजपचे हरिभाऊ बागडे हे पराभूत झाले आणि शिवसेनेने अध्यक्षपद आता निवडून आलेले संचालकच ठरवतील अशी भूमिका घेतली. त्यामुळे साहजिकच नितीन पाटील बेचैन होते; पण सत्तार-भुमरे या जोडीच्या डोक्यात वेगळेच सुरू होते हे नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने स्पष्ट झाले.

Edited - Ganesh Pitekar

loading image