Cabinet Expansion :पालकमंत्रिपदासाठी आता रस्सीखेच

सर्वांनाच हवे पद, पण म्हणतात...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील तोच
Cabinet Expansion
Cabinet Expansion

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकार बनविण्यात आघाडीवर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने मंत्रिमंडळाच्या विस्तारात बाजी मारत तीन कॅबिनेटमंत्रिपदे पदरात पाडून घेतली. यात शिंदे गटाला दोन तर भाजपला एक मंत्रिपद मिळाले. आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि पालकमंत्रिपदाकडे आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्याचा कारभार अब्दुल सत्तार, भुमरे की अतुल सावे कोणाच्या हाती येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे अब्दुल सत्तार यांनी जादुई कांडी फिरवीत मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळवत अनेकांना धक्का दिला. यामुळे पालकमंत्रिपदासाठी सत्तारांनी जोरदार फिल्डिंग लावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू असलेल्या अतुल सावे हे पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. लोकसभा मतदारसंघ आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी अतुल सावे यांना पालकमंत्रिपद देण्याची तयारी भाजपतर्फे केली जात आहे.

खाते वाटपातही चांगले खाते मिळवण्यासाठी शिंदे गटातील मंत्री प्रयत्नशील आहेत. यासाठी मुंबईतच जिल्ह्यातील मंत्री मुक्काम ठोकून होते. सत्तार यांनी महसूलमंत्री पदासाठी तर अतुल सावे हे उद्योगमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. आगामी दोन दिवसांत खाते वाटप होणार आहे. खाते वाटपावर पालकमंत्रिपद अवलंबून राहणार आहे. आतापर्यंत युती सरकारमध्ये सर्वाधिक शिवसेनेचाच पालकमंत्री राहिला आहे. ही भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे. यामुळे सध्या प्रबळ दावा भाजपतर्फे केला जात आहे.

शिरसाटांच्या ट्विटमुळे कलगीतुरा

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटवरून राज्यभरात चर्चा अन् आरोप-प्रत्यारोपाचा शनिवारी (ता.१३) दिवसभर चांगलाच धुराळा उडाला. मंत्रिमंडळात संधी न मिळल्याने नाराज असलेले आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटरवरून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानभवनातील एक व्हिडिओ, ‘कुटुंब प्रमुख’ लिहिलेले ट्विट करण्यात आले. जुनी मार्चमधील पोस्ट चुकून फॉरवर्ड झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

रात्री केलेले हे ट्विट शनिवारी सकाळी शिरसाट यांच्या खात्यावरून काढून टाकण्यात आले होते. या संदर्भात शिरसाट म्हणाले की, मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपले मानले तर त्याच्यासाठी मान कापली गेली तर हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती मान्य असेल. एकनाथ शिंदे आता आमचे कुटुंबप्रमुख आहेत. उद्धव ठाकरेंची भूमिका पटत नाही मात्र नातं तोडलेलं नाही, आम्ही दूर गेलो नाही, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

रात्रीच्या ट्विटवर काय बोलू ः दानवे

औरंगाबाद ः `रात्रीच्या ट्विटवर मी काय बोलू, चुका रात्रीच होत असतात, सकाळी त्या लक्षात येतात. त्यामुळेच रात्रीचे ट्विट सकाळी डिलीट झाले`, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिरसाटांची खिल्ली उडवली. आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या ट्विटवरून ते पुन्हा शिवसेनेत परतणार का? यावर चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शिरसाटांनी सकाळी ते ट्विट डिलीट केले. यावरून अंबादास दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते रात्रीचे ट्विट होते, त्यावर मी काय बोलू? शिरसाट यांनी यापूर्वी जेव्हा बंडखोरी केली होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, अशी आठवण दानवेंनी यावेळी करून दिली. शिरसाट परत आले तर त्यांचे स्वागत कराल का? यावर शिंदे गटात गेलेल्या आमदारांबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे, तीच आमची देखील राहील, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com