Aurangabad : लस घेतली तरच पेट्रोल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad
Aurangabad : लस घेतली तरच पेट्रोल!

Aurangabad : लस घेतली तरच पेट्रोल!

औरंगाबाद : मास्क, लसीबाबत कोणतीही तपासणी न करता पेट्रोल विक्री करणाऱ्या महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंपाला रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरवठा विभागाने सील केले होते. या कारवाईनंतर जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांचे धाबे दणाणले असून कारवाईच्या भीतीने काही पंपावर लस घेतली आहे का अशी विचारणा केली जात आहे तर अजूनही काही पेट्रोलपंपावर सर्रास आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २२) शहरातील सर्व पंपचालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन तपासणी केल्याशिवाय पेट्रोल विक्री न करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: पांड्याचं काही खरं नाही; BCCI निवड समिती 'नो रिस्क मूड'मध्ये

कोरोना महामारीचा प्रकोप अनुभवलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के असल्याने व जिल्हा लसीकरणात मागे असल्याने काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्र्यांनी लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले होते. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीकरणावर भर देण्याच्या अनुषंगाने लोकांना पेट्रोल, रेशन, गॅससाठी लस घेणे अनिवार्य केले. एवढेच नाही तर कोणत्याच शासकीय कार्यालयात प्रवेश देऊ नये, असे आदेश काढले होते. परंतु, या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंपावर कोणतीही तपासणी न करता विक्री होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हा पंप सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी रात्री साडेआठ वाजता पेट्रोल पंप सील करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने जिल्ह्यातील सर्वच पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने त्यांनी तपासणीला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. काहींनी बॅरीकेटर्स लावून मास्क, लसीकरणाबाबची तपासणी सुरू केली आहे. लस घेतली असल्याचे दिसून आल्यानंतरच पेट्रोल दिले जात आहे. त्यामुळे पंपांवर गर्दी होऊ लागली आहे. तर काही जणांना रिकामेच परतावे लागत आहे. काही पंपांवर असे चित्र असताना दुसरीकडे काही पंप चालक अद्यापही निर्धास्त असल्याचे दिसून आले.

बाबा पेट्रोल पंप सुरू

आदेशाचे उलंघन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रविवारी रात्री बाबा पेट्रोल पंपाला सील ठोकण्यात आले होते. सोमवारी (ता.२२) दिवसभर हा पंप बंदच होता. दरम्यान, पंप चालकाने आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंप सुरू करण्यास अनुमती दिली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रात्री साडेसात वाजता बाबा पेट्रोल पंपाला भेट देऊन पाहणी केल्यानंरच पंप चालू करण्यात आला.

बैठकीत निर्देश

आदेशाच्या कडक अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील सर्व पंप चालकांची सोमवारी बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सर्वांनी पालन करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी दिले. चेहऱ्याला मास्क आणि लस घेतली असेल तरच पेट्रोल, रेशन आणि गॅस देण्यात यावा, असेही सांगितले.

आदेशाविरोधात न्यायालयात धाव

लसीकरण ऐच्छिक आहे ते, बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, आरोग्य मंत्र्यांनीही स्पष्ट केले असताना, पेट्रोलपंपावर वाहनधारकांना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय इंधन न देण्याचा जिल्हाधिकारी निर्णय घेतात. तो योग्य नसल्याचे सांगत या आदेशा विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा एकमुखी निर्णय पेट्रोल-डिलर्स असोसिएशनच्या बैठकीत सोमवारी (ता.२२) घेण्यात आला आहे, अशी माहिती सचिव अकिल अब्बास यांनी दिली.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

शहरात रविवारपासून (ता.२१) जिल्हाधिकाऱ्यांनी '' नो लस, नो पेट्रोल'' या आदेश जारी केले. याचे पालन न केल्याने बाबा पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली. सोमवारपासून शहरातील विविध पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासल्यावरच इंधन देण्याची कार्यवाही सुरू झाली. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे पंपचालकांमध्ये संतापाची भावना आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अकिल अब्बास म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही लस नसेल तर पेट्रोल, रेशन देण्यास बंदी आणता येणार नसल्याचे सांगितले आहे. इंधन भरण्यासाठी पंपावर येणाऱ्या लोकांना लस घेतल्याबद्दल विचारणा करणे, त्यांच्याकडील प्रमाणपत्र तपासणे, त्यांना लस घेण्याबाबत सांगणे हे काही पंपचालक, मालकांचे काम नाही. वाहनधारक हे आमचे ग्राहक आहेत. लसीकरणाच्या कामात प्रशासनाला सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. प्रत्येक पंपावर प्रशासनाने अधिकारी नेमावेत.

...तर वाहन परवाना निलंबित

शहरातील रिक्षा चालकासह खासगी प्रवासी बस चालकांनी लसीचा एक डोस घेणे बंधनकारक आहे. लसीचा डोस घेतला असेल तरच आपली वाहने रस्त्यावर उतरवा अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिला.

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी (ता. २२) शहरातील रिक्षा चालक संघटनासह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालक संघटनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शहरातील सर्व रिक्षा चालक संघटनासह खासगी बस चालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील सर्व रिक्षा चालक तथा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकांनी कोविडची एकतरी लस घेतलेली असणे आवश्यक आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही अशा रिक्षा चालकासह बस चालकावर आरटीओ कार्यालयाचे अधिकारी व शहर वाहतूक शाखा हे संयुक्त पणे कारवाई करतील, प्रसंगी त्यांचा वाहन परवानाही निलंबीत करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

loading image
go to top