esakal | औरंगाबाद: पित्याच्या खुनाच्या आरोपातील मुलास सशर्त जामिन मंजूर । MURDER CASE
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद: पित्याच्या खुनाच्या आरोपातील मुलास सशर्त जामिन मंजूर

औरंगाबाद: पित्याच्या खुनाच्या आरोपातील मुलास सशर्त जामिन मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पित्याच्या खुनाच्या आरोपातील संशयित मुलास न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह अटी शर्तींवर नियमित जामिन मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. आगरकर यांच्यासमोर झाली. ऋषीकेश राजेश मुसळे (२३, रा. साईनगर, सिडको महानगर) असे त्या संशयित मुलाचे नाव असून, त्याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

संशयित ऋषीकेश याचे वडील ७ एप्रिल २०२१ रोजी आईला मारहाण करत असताना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, दरम्यान, दोघांची वादावादी झाली. यातून संशयिताने केलेल्या मारहाणीनंतर त्याचे वडील खाली पडले, त्यांना घाटी रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटना अपघाती झाल्याचे सांगितल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा: रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

पोलिसांनी ऋषीकेशला २३ जून रोजी अटक केली होती. दरम्यान, ऋषीकेशने अॅड. अक्षय तिळवे आणि अॅड. संदीप मयुरे यांच्यामार्फत न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शीं साक्षीदार हे विश्वासपात्र नसून सदर प्रकरणातील गुन्हा कलम ३०२ नुसार घडल्या नसल्याचा युक्तिवाद अॅड. तिळवे यांनी केला. दरम्यान, विविध न्यायनिवाड्यांचा दाखला देण्यात आला.

सुनावणीअंती न्यायालयाने ऋषीकेश मुसळे याचा नियमित जामीन अर्ज २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह २० सप्टेंबरपासून पुढचे सहा महिने प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे आदी अटीशर्तींवर मंजूर केला.अर्जदारातर्फे अॅड. अक्षय तिळवे यांनी बाजू मांडली. अॅड.तिळवे यांना अॅड. नकुल सावंगीकर, अॅड. पार्थ खंडागळे पाटील यांनी सहाय्य केले.

loading image
go to top