औरंगाबादेत कोरोनाचा एखादा रुग्ण आढळलाच, तर... 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, सरकारने राज्यभरात अलर्ट जारी केल्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सज्ज केली आहे. महापालिकेतर्फे चोवीस तास कंट्रोल रूम तयार केली असून, घाटी रुग्णालयाची सुपर स्पेशालीटीसाठी बांधण्यात आलेली इमारत ताब्यात घेतली घेतली जाणार आहे.

एखादा रुग्ण आढळलाच तर याठिकाणी उपचार केले जाणार आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश महपौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. चार) झालेल्या बैठकीत दिले. अतिदक्षता विभागात बेड राखीव ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राला देखील धोका असल्याचे समोर असल्यामुळे राज्य शासनाने अलर्ट जारी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर दालनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रमुख खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत सकाळीच बैठक घेण्यात आली.

यावेळी संशयित रुग्णांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महापालिकेतर्फे चोवीस तास कंट्रोल रूम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एमजीएम रुग्णालयात २० बेड, जिल्हा सामान्य रुग्णालयात १० बेड, इएसआयसी रुग्णालयात एक वॉर्ड, सिग्मा, बजाज, माणिक हॉस्पिटलने देखील अतिदक्षता विभागात बेड राखीव ठेवण्याची तयारी दर्शविली. कोरोणाची लागण झालेल्या १५ देशामधून एखादा प्रवासी आल्यास त्याचे विमानतळावर स्क्रिनिंग केले जात आहे. मात्र दुसऱ्या स्क्रिनिंगसाठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये सेंटर तयार ठेवले जाणार आहे.

‘घाटी’त सुपर स्पेशालीटी रुग्णालयाची इमारत तयार असून, ही इमारत ताब्यात घेऊन २०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. ३० डॉक्टर ६० नर्सही तैनात ठेवले जाणार आहेत. कोरोना संशयितावर उपचारासाठीचे प्रशिक्षण घाटी रुग्णालयातर्फे दिला जाणार आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षा म्हणून मास्कची राज्य शासनाकडे मागणी केली जाणार आहे, नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागरण केले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठकीनंतर सांगितले. 

बैठकीला आरोग्य उपसंचालक तथा समन्वयक डॉ. सतीश लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, आयएमएचे सत्यनारायण सोमानी, कुलदिपसिंग रावल, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब शेख, घाटीच्या मिनाक्षी भट्टाचार्य, इएसआयसीचे डॉ. विवेक भोसले, छावणी परिषदेच्या डॉ. नवल मालू, कॅन्सर हॉस्पीटलच्या डॉ. राठोड, विमानतळ प्राधिकरणाचे अनिल शिंदे उपस्थित होते. 

२५ लाखांचा निधी राखीव ठेवणार 

शहरात कोरोनाचा रुग्ण आढळलाच तर उपचारासाठी निधीची कमतरता पडू नये, यासाठी महापालिकेला २५ लाख रुपयांचा निधी तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण असेल तर त्याची ओळख लपविली जाणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com