Aurangabad: डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद : डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा

औरंगाबाद : मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठरावीक मालमत्तांची यादी देण्यात आली आहे. पण हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का? कार्यालयात वेळेवर येतात का? याची तपासणी कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीत दोन प्रभागात तब्बल ५२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जात आहेत. दरम्यान अनेक जण दुपारच्या जेवणासाठी गायब होत असल्याने आता कार्यालयात येताना डबे घेऊन या, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा मालमत्ता कराचे ४६८ कोटी ५४ लाख तर पाणीपट्टीचे १०८ कोटी ५७ लाख रुपये एवढे वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे. थकबाकीदार व्यावसायिक मालमत्तांना सील लावण्याची कारवाई सध्या सुरू आहे. त्यासोबत कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक प्रभाग कार्यालयात जाऊन वसुली कर्मचाऱ्यांची हजेरी घेत आहेत.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्यांच्या पाहणीत अनेक कर्मचारी गैरहजर आढळून येत आहेत. मंगळवारी (ता. २३) त्यांनी प्रभाग एकमध्ये जाऊन पाहणी केली असता ४४ पैकी ३२ कर्मचारी गैरहजर होते. त्यांना चौकशी केली असता, कोणी फिल्डवर आहे तर कोणी जेवणासाठी आत्ताच घरी आलो आहे, अशी कारणे दिली. त्यामुळे थेटे यांनी प्रत्येकाने कार्यालयात येताना डबा घेऊन यावा, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा

बुधवारी (ता. २४) प्रभाग चारला थेटे यांनी अचानक भेट दिली. त्यात २८ पैकी २० कर्मचारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वॉर्ड अधिकारी विक्रम दराडे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच प्रभाग एकमधील गैरहजर कर्मचाऱ्यांना देखील नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे श्रीमती थेटे यांनी सांगितले.

loading image
go to top