औरंगाबादेत 'स्पेशल 26'; मंत्रालयात ओळख सांगून हॉटेल मालकाला ४१ लाखांचा चुना!

जेवणाच्या कंत्राटांची मारायचे थाप : कारला ‘महाराष्ट्र शासन’ नावाचा लोगोही
Filed
Filed sakal

औरंगाबाद : आपण मोठ्या केटरर्सचे मालक असून मंत्रालयात ओळखी आहेत, तसेच तुम्हाला राज्यभरातील मोठमोठ्या शहरातील कोविड रुग्णालयाला जेवण पुरविण्याचे काम देतो म्हणत महिलेसह तिचा कथित पती, अन्य एक अशा औरंगाबाद, मुंबई, नाशिकमधील तिघांनी औरंगाबादेतील हॉटेलला तब्बल ४१ लाख ५ हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला.

भक्तबंधू पाढी (५२, रा. अहिंसानगर, आकाशवाणी) यांच्या फिर्यादीवरुन तिघा आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रजनी रानमारे (४३, रा. फ्लॅट ए-४, अवंतिका अपार्टमेंट, प्रतापनगर दर्गा रस्ता, औरंगाबाद), कथित आरोपी पती संदीप बाबुलाल वाघ (४७, रा. फ्लॅट १०२, बी-१, लोक निसर्ग, मुलूंड पश्चिम), स्वप्नील भरत नांद्रे (२४, रा. बालाजी रो हाऊस नं. २, उदय कॉलनी, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.

पाढी यांच्या फिर्यादीनुसार सिडकोमध्ये त्यांचे नैवैद्य हॉटेल आहे. हॉटेलची जागा ही सुबोध गीते यांच्या मालकीची असून संशयित रजनी ही गीतेंच्या ओळखीची असल्याने ती नैवैद्य हॉटेलात जेवणासाठी येत असे. जानेवारी २०२१ मध्ये रजनीने पाढी यांना आपण आर. बी. केटरर्स ॲण्ड फुड सप्लायर्सची मालक असून पती संदीप वाघ हा मेडीकल असोसिएशनचा डायरेक्टर असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे राज्यभरातील कोविड सेंटरला कोरोना किटचा पुरवठा करण्याचे काम असल्याचे सांगत मंत्रालयातही ओळखी आहेत, असे भासविले. जे जे रुग्णालयात ४ हजार लोकांच्या जेवणाची निविदा वाघ यांच्यामुळे मिळाल्याचेही सांगितले.

अन् विश्वासात घेऊन....

रजनीने कागदपत्रे, जीएसटी परवाना, सरकारी शिक्क्यांचा दस्तावेज दाखवून पाढी यांचा विश्वास संपादन केल्याने पाढी यांनीही सोबत काम करण्याचे ठरविले. दरम्यानच्या काळात रजनी रानमारे, आणि संदीप वाघ आणि स्वप्निल नांदे हे महाराष्ट्र शासनाचा लोगो व नाव लावलेल्या कारमधून पाढींना रेस्टॉरंटवर भेटायला आले. रजनीने नांद्रेशी भेट घालून देत महाराष्ट्र सिविल फोर्स, आपत्ती व्यवस्थापन पुणे येथे जीवरक्षक पदावर काम करत असल्याचे सांगून तसे ओळखपत्रही दाखविले. रजनीच्या सांगण्यावरुन १९ जानेवारी २०२१ रोजी पाढी यांनी तिला ४ हजार लोकांच्या जेवणाचे दरपत्रक (कोटेशन) कोटेशन व्हाटस अप, मेलद्वारे पाठवले. त्यानंतर तिघांसोबत वारंवार भेटी, चर्चा झाल्या.

टेंडरसाठी रक्कम भरण्याची मागणी

रानमारेच्या सांगण्यानुसार ८ एप्रिल ते ४ मे २०२१ या काळात पाढी यांनी २९ लाख पाच हजार रुपये दिले. त्याचदरम्यान, रानमारे आणि नांद्रेच्या सांगण्यानुसार वेळोवेळी एकूण १४ लाख रुपये रोख दिले. पुढे २१ एप्रिल २०२१ कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करुन ऑर्डर देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर चाचणीतील काही कर्मचा-यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सांगत आता पुढील २१ दिवस कामाची ऑर्डर देऊ शकत नाही असे रानमारे म्हणाली. त्यानंतर तिने २५ मे २०२१ ला कोल्हापूरला बोलावून घेतले. तेथे सहा जणांनी कोल्हापुरातील कोविड सेंटरच्या जागेची पाहणी केली. तेथील पाढी यांचे मित्र संतोष तिमप्पा शेट्टी यांच्या साहाय्याने काम करण्यासाठी शेट्टी यांच्यासोबत करारनामा केला. त्यानंतर याच तिघांनी वेळोवेळी विश्वासात घेऊन ४५ लाख पाच हजार रुपये उकळले. त्यापैकी चार लाख रुपये रोखीने परत केले. मात्र, उर्वरीत पैसे देण्यास तिघांनी नकार दिला.

फसवणूक झाल्याचे उघड

तिघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे अखेर पाढी यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. तेथील सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिघांशी वारंवार संपर्क साधला. प्रकरणाची खातरजमा करुन जारवाल यांनी गुन्हा दाखल करुन घेण्याचे कळविले. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत.

पर पुरुषालाच म्हणते ‘हा माझा पती’

विशेष म्हणजे आरोपी रजनी रानमारे हिचा पती हा संदीप वाघ नाही. मात्र फिर्यादीशी सलगी वाढवून फसवणूक करण्यासाठी आरोपी रजनी हिने संदीप वाघ हाच आपला पती असल्याचे भासवले असल्याची माहिती फिर्यादी भक्तबंधू पाढी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com