
औरंगाबाद : बिबट्याच्या हल्ल्यात चार बकऱ्या ठार
पिशोर : मोहंद्री (ता.कन्नड) येथे बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात चार बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. मागील दीड महिन्यात या परिसरात पाळीव प्राण्यांवर झालेला हा पाचवा हल्ला आहे.
येथील गट क्रमांक १५३ मध्ये रमेश धनवई यांच्या मालकीच्या काही बकऱ्या गोठ्यात बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने गोठ्यात शिरून चार बकऱ्या ठार केल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. यापूर्वी मार्च महिन्याच्या शेवटी व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गट क्रमांक १५५ व १५८ मध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू व कालवड ठार केले होते. मागील दोन महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास सात बकऱ्या, एक बकरीचे पिल्लू, म्हशीचे वगारू, एक वासरू, एक कालवड ठार झाले आहे.
वासराचा बचाव करणारी एक गाय यात जखमी झालेली आहे. पिशोर परिसरातील हस्ता, खातखेडा, मोहंद्री, तपोवन या परिसरात बिबट्या व बिबट्याच्या मादीचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभाग आणखी किती जनावरे मरण्याची वाट बघत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून येथे वावर असलेल्या बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी होत आहे.