औरंगाबाद : IPL सट्टा, तिघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad IPL betting Three arrested

औरंगाबाद : IPL सट्टा, तिघे अटकेत

औरंगाबाद : आयपीएलच्‍या लखनऊ जायंटस् विरुद्ध गुजरात टाईटन्‍स मॅचवर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या तिघांना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापा मारून अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. दहा) रात्री चिकलठाणा येथील लक्ष्‍मीनगरातील एका गोडाऊनवर करण्‍यात आली. आरोपींकडून नऊ मोबाइल, दोन रजिस्‍टर, कार, नऊ हजारांची रोख असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला.

शुभम संजय पांडे (वय २३, रा. बेगमपुरा), राजेश विक्रम गावंदे (वय ३६, रा. चुनाभट्टी, खोकडपुरा) आणि राजेश सुधाकर पुंड (वय ५१, रा. बन्‍सीलालनगर रेल्वेस्‍टेशन) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांना गुरुवार (ता. बारा) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले आहेत. चिकलठाणा परीसरातील लक्ष्‍मीनगरात एका गोडाऊन व कारमध्‍ये शुभम पांडे आयपीएलमधील लखनऊ जायंटस् विरुद्ध गुजरात टाईटन्‍स मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्‍यानुसार, सहायक निरीक्षक महांडुळे यांच्‍या पथकाने छापा टाकून वरील तिघांना अटक केली. त्‍यांची चौकशी केली असता, मोबाइलवर किंवा rose1010.com या वर क्रिकेटच्‍या लाइव्‍ह मॅचवर सट्टा खेळणाऱ्या लोकांकडून सट्टा घेतो व त्‍याची नोंद रजिस्‍टरमध्‍ये करतो अशी माहिती आरोपींनी दिली. आरोपींची झडती घेण्‍यात आली असता, आरोपी शुभम पांडे याच्‍या ताब्यातून कार (एमएच-०२, एव्‍ही-१५११), सहा मोबाइल, वायफाय राऊटर, दोन रजिस्‍टर, आठ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम तर आरोपी राजेश गावंदे याच्‍या ताब्यातून दोन आणि राजेश पुंड याच्‍या ताब्यातून एक मोबाइल असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील एस. एल. दास यांनी युक्तिवाद केला. आरोपींकडून जप्‍त करण्‍यात आलेल्या कार आणि मोबाइलबाबत तपास करायचा आहे. आरोपींकडील मोबाइल व वेबसाइटवर कोणकोण सट्टा खेळतो आहे, अटक आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपींना सिमकार्ड घेण्‍यासाठी कोणत्‍या व्‍यक्तीने मदत केली याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

Web Title: Aurangabad Ipl Betting Three Arrested Action Taken By Crime Branch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top