esakal | संतप्त नागरिकांनी ठोकले पाण्याच्या टाकीला कुलूप, पवननगरात ठणठणाट
sakal

बोलून बातमी शोधा

Citizen Locked Water Tank

शहराला पाणीपुरवठा करणारा नाथसागर काठोकाठ भरला असला तरी महापालिकेची पाणीपुरवठा योजना कुचकामी झाल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

संतप्त नागरिकांनी ठोकले पाण्याच्या टाकीला कुलूप, पवननगरात ठणठणाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात पाण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. पवननगर भागात शुक्रवारी (ता. २२) पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांनी सिडको एन-सात येथील पाण्याच्या टाकीवर येऊन आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा कार्यालयाला कुलूप ठोकले. महापालिका अधिकाऱ्यांनी धाव घेत तातडीने टॅंकर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी कुलूप उघडून आंदोलन मागे घेतले.

शहराला पाणीपुरवठा करणारा नाथसागर काठोकाठ भरला असला तरी महापालिकेची पाणीपुरवठा योजना कुचकामी झाल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे उन्हाळा सुरू झालेला नसताना पाण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. हडकोतील पवननगर भागाला शुक्रवारी पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. त्यानुसार त्यांना सकाळी ७.३० वाजता पाणी येणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, नळाला पाणी आलेच नाही. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक सकाळी दहा वाजता थेट सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर जमा झाले.

याठिकाणी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी हजर नसल्याने नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक पद्मे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतरही दीड तास पाण्याच्या टाकीवर कोणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला व त्यांनी ११.३० वाजता पाण्याच्या टाकीच्या परिसरात असलेल्या कार्यालयास कुलूप ठोकले व ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर उपअभियंता अशोक पद्मे हजर झाले, त्यांनी टॅंकर पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी कार्यालयाला लावलेले कुलूप उघडले. आंदोलनात ललित सरदेशपांडे, राहुल सोनवणे, तन्मय ढगे यांच्यासह इतर सहभागी झाले होते.

Edited - Ganesh Pitekar

loading image