esakal | कोविड सेंटरच्या बाजूलाच भडकली आग, रुग्णांची धावपळ

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरपासून हाकेच्या अंतरावर गुरुवारी आगीचा भडका उडाला.
कोविड सेंटरच्या बाजूलाच भडकली आग, रुग्णांची धावपळ
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटर लगत गुरुवारी (ता. २९) आग भडकल्याने एकच धावपळ उडाली. रोहित्राचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला व गवताने पेट घेतला. त्यानंतर वीज गुल झाली व सर्वत्र धूर झाल्याने रुग्ण बेड सोडून सेंटर बाहेर पडले. दरम्यान अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करत पाच-दहा मिनिटात आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. विरार येथील कोविड हॉस्पिटलला आग लागल्याचा पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरातील कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरचे फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. असे असतानाच अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयालगत व कोविड केअर सेंटरपासून अवघ्या काही अंतरावर गुरुवारी रात्री आग भडकली. याठिकाणी रोहित्र असून, रोहित्रातून ठिणगी पडून गवताने पेट घेतला व काही क्षणात आगीचा भडका उडाला. त्यानंतर वीज गुल झाली. सर्वत्र धूर झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्णांची धावपळ सुरू झाली. काही जण बेड सोडून बाहेर आले. दरम्यान रोहित्र असल्याने याठिकाणी पाण्याचा मारा करणे शक्य नसल्याने स्प्रेचा वापर करून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच- दहा मिनिटात आग आटोक्यात आणल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

माजी महापौर बारवाल यांची मदत

पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ७० रुग्ण उपचार घेत आहेत. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही. आगीबाबत माहिती नसल्याचे कोविड केअर सेंटरच्या प्रमुख डॉ. उज्वला भांबरे यांनी सांगितले. आगीबाबत माहिती मिळताच माजी महापौर गजानन बारवाल व संदीप बारवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यास मदत केली व रुग्णांना धीर दिला.