esakal | औरंगाबादेत दिवसभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण, साडेअकरा हजार जणांनी घेतली लस

बोलून बातमी शोधा

सीरम व बिल गेट्‌स फाऊंडेशनमध्ये लस निर्मितीसाठी सहकार्य 
औरंगाबादेत दिवसभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण, साडेअकरा हजार जणांनी घेतली लस
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने सोमवारी (ता. २६) नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे दिवसभरात रेकॉर्डब्रेक ११ हजार ६२१ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे टास्क फोर्सच्या प्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यासोबतच दोन सरकारी व २६ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख दोन हजार ८१३ नागरिकांना लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लसीकरण केले जात होते. पण शुक्रवारी (ता.२३) दुपारनंतर महापालिकेकडील लसींचा साठा संपला होता. त्यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होते. दरम्यान महापालिकेला रविवारी २५ हजार लसी मिळाल्या. त्यामुळे लसीकरण सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. दोन दिवसांच्या खंडामुळे सकाळपासूनच ४५ वर्षांवरील नागरिकांनी गर्दी केली. अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ११ हजार ६२१ नागरिकांनी लस टोचून घेतली. ७१३ आरोग्य कर्मचारी, १८४५ फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील ४,९७४, ६० वर्षांवरील ४,०८९ याप्रमाणे ११ हजार ६२१ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे श्रीमती थेटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा: उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह

अनेक केंद्रावर दुपारनंतर संपला साठा

महापालिकेला २५ हजार लस मिळाल्या असल्या तरी प्रत्येक केंद्राला ठरल्याप्रमाणे साठा दिला जातो. पण सोमवारी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे दुपारीच केंद्रावरील लसीचा साठा संपला. अनेकांना आल्या पावली परत फिरावे लागले. आयएमए हॉल, विजयनगर, शिवाजीनगर, औरंगपुरा, समर्थनगर, सिडको-हडको भागातील केंद्रावर दुपारनंतर लस संपल्याचे बोर्ड लागले होते.