सकाळी सुरू अन् दुपारी बंद! व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traders Opposes LockDown In Aurangabad

व्यापारी महासंघाने घेतलेला निर्णय हा जिल्हा प्रशासनाचा नाही. त्यामुळे दुकाने बंद ठेवा अशा सूचना पोलिसांनी फिरत्या वाहनातून दिल्या.

सकाळी सुरू अन् दुपारी बंद! व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा 

औरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर असोसिएशनतर्फे सोमवारपासून(ता.१२) व्यापारी आस्थापने सुरु करावीत, अशी सूचना केली. त्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापारी आस्थापना सकाळी दहानंतर उघडण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी ब्रेक द चेनअंतर्गत जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे सांगत दुकाने बंद करायला लावली. यामुळे सोमवारी सकाळी दुकाने सुरू तर दुपारी बंद राहिली. दरम्यान, व्यापारी महासंघाचा निर्णय पाळल्यास पोलिस गुन्हे दाखल करतील, त्यामुळे नेमके काय करावे, या संभ्रमात व्यापारी व ग्राहकही दिसून आले. 

Corona Updates: चिंताजनक! औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार


व्यापारी महासंघाचा रविवारी मध्यरात्री दुकाने सुरु करण्याविषयी निर्णय झाला. मोठ्या आनंदाने पैठणगेट, गुलमंडी, कुंभारवाडा, सराफा मार्केट, कॅनॉट प्लेस, टि.व्ही सेंटर आणि शिवाजीनगर येथील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली. शनिवार-रविवारी शहरात कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे सोमवारी दुकाने उघडल्यामुळे मोठी गर्दी झाली. त्याच वेळी पोलिस दाखल होत, त्यांनी दुकाने बंद करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामुळे पैठण गेट परिसरात गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. 

औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त

शटर बंद, व्यवसाय चालू 
पाडव्याच्या महुर्तावर व्यापारी आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यात पाडव्याला ग्राहक खरेदीला येईल, याच आशेने दुकाने सुरु केली होती. पोलिसांच्या सूचनेप्रमाणे दुकाने बंद केली, मात्र, काही दुकानदारांनी दुकानाबाहेर थांबून ग्राहकांना सेवा दिली. म्हणजे शटर बंद मात्र ग्राहकांना लागणारे साहित्य अनेक दुकानदार देत होते. काहींनी तर अर्धे शटर उघडे ठेवले होते. मोतीकारंजा भागात कुलर मार्केट बिनधास्त सुरु होते. 

आम्हाला काळजी ठेकेदारांची; रुग्ण तडफडू देत, कोरोना लस संपली अन् रेमडेसिविरचा काळाबाजार

पोलिसांनी केली जनजागृती 
व्यापारी महासंघाने घेतलेला निर्णय हा जिल्हा प्रशासनाचा नाही. त्यामुळे दुकाने बंद ठेवा अशा सूचना पोलिसांनी फिरत्या वाहनातून दिल्या. तत्पूर्वी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कॅटचे उपाध्यक्ष अजय शाह, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष विजय जैस्वाल, गुलाम हक्काणी, तनसुख झांबड, राम वारेगावकर यांनी टिळकपथ परिसरात भेटी देत, शटर उघडून दुकाने सुरु केली होती.  किमान मंगळवारी संपूर्ण लॉकडाऊनपूर्वी साफसफाई व इतर कामासाठी दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासन परवानगी देणार का, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे. 


एकीकडे स्थानिक दुकानदार, विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले जाते. कारवाई केली जाते. तर दुसरीकडे बंदच्या काळात ऑनलाईन विक्रीला सर्रास परवानगी कशी दिली जाते, हा स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय नाही का? 
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ 

लॉकडाऊनपूर्वीच्या तयारीसाठी, मार्च एण्डची कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन व राहिलेला माल उतरवून घेण्यासाठी काही दिवस व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवावीत,  अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र, त्यास राज्य सरकारचा प्रतिसाद नाही. 
- अजय शहा, राज्य उपाध्यक्ष, कॉन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन 
 

संपादन - गणेश पिटेकर 

Web Title: Aurangabad Latest News Traders Open Their Shops After Shut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Paithan
go to top