आम्हाला काळजी ठेकेदारांची; रुग्ण तडफडू देत, कोरोना लस संपली अन् रेमडेसिविरचा काळाबाजार

Beed Corona Breaking News
Beed Corona Breaking News

बीड : लसीचा साठा संपला आणि लसीकरणही बंद झाले. रेमडेसिविरचा तुटवडा आणि काळाबाजार जोरात सुरू झाला. ऑक्सिजन उपलब्ध करताना यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहेत. अनेक कारणांनी रुग्णांची तडफड सुरू असताना जिल्ह्याचे तारणहार मात्र दिसत नाही.  कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाय योजनांसाठी आलेल्या निधीतली कामे ठेकेदारांना मिळावी यासाठी सर्व ताकद पणाला लावली आणि त्यात यशही मिळाले. त्यामुळे आता रुग्ण तडफडले तरी त्याचे काय देणे-घेणे, अशीच स्थिती जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यात काहीही आले तरी ‘मी आणि आम्हीच’ असा सूर आळवणारी मंडळी जिल्हा सध्या संकटात असताना सामान्यांच्या मदतीला धावताना दिसत नाही. विशेष म्हणजे अलीकडे तर आम्ही मिळविले, पाठपुरावा केला याच्या पुढे जाऊन शासकीय निधी दिल्यानंतरही आम्ही दिले (जणू खिशातून दिले) असा नवा पायंडा पडला आहे. फक्त वीज, महापूर, दुष्काळ याचेच 
श्रेय घ्यायचे राहिलेली मंडळींनी या संकट काळात लोकांना धीर देण्यासाठी पुढे यावे एवढीच अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे दुष्काळात जनावरांचा पुळका दाखविणारे, छावण्या सुरू करा म्हणून आक्रोश करणारेही आता गुडूप झालेत. जनावरांचा पुळका म्हणजे छावण्या सुरू करून त्या आडून शासन तिजोरीवर डल्ला मारायचा असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, आता लोकांसाठी खाटांची उपलब्धता, रेमडेसिव्हर इंजेक्शन रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी साधे कोणाचे मदत केंद्रही जिल्ह्यात नाही. मग राजकारण फक्त श्रेय घेण्यासाठी, शासनाचा निधी कार्यकर्त्यांच्या झोळीत टाकण्यापुरतेच का, असा सवालही उपस्थित होत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे.

नियमित आढळणारी रुग्णसंख्येने साडेसातशेचा पल्ला पार केलाय. विशेष म्हणजे मधल्या काळात शेकडा प्रमाण दहा टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत गेले. पहिल्या लाटेवेळी जिल्ह्यातील एका दिवशी सक्रिय रुग्णांचा सर्वोच्च आकडा २,७२० वरून आता साडेपाच हजार म्हणजेच दुप्पट झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची कुवत सर्वांना माहीत आहेच. आर्थिक कुवत असलेले लोक खासगीत दाखल होत असले तरी रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या काळाबाजाराने डोके वर काढले आहे.

औषध विक्रेत्यांसमोर औषधी प्रशासनाने केव्हाच लोटांगण घातले आहे. अगदी आष्टीच्या रुग्णासाठी बीडला इंजेक्शन घ्यायला यावे लागते. प्रशासनाच्या खांद्यावर सध्या धुरा असून, सर्वच अधिकारी आपापल्या परीने कामे करत आहेत. काही कार्यालये अगदी रात्री एक वाजेपर्यंत उघडी दिसताहेत. म्हणजे त्यांनी तरी लोकांना वाऱ्यावर सोडले नाही असे दिसते. काही नेत्यांचेही त्यांच्या कुवतीप्रमाणे मदत, सल्ला सुरू आहेच तोही नाकारता येणार नाही. 

नको ते दिले आणि अवाजवी किमतींना 
जिल्ह्यातील नेत्यांचे धोरण म्हणजे ठेकेदारांचे खिसे कसे भरतील असेच आहे. आता कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समिती, गौण खनिज आणि आपत्ती व्यवस्थापन यातून ६० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यातून लोखंडीच्या रुग्णालयाला सीटीस्कॅन मशीन किंवा जिल्ह्यात कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स घेतली नाही. पण, कोटींचे सीसीटीव्ही, कोट्यवधींचे सॅनिटायझर, दुरुस्त्या अशी कामे वेगाने उरकून घेतली. ठेकेदार ठरलेले होते. सर्वांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वाटेही मिळाले. त्यांच्याच एजन्सीला कामे मिळावीत हा उद्देशही साध्य झाला आणि १,३०० रुपयांचे थर्मल गण सहा हजारांना खरेदी केले गेले. पण, आम्ही दिले म्हणून मोकळे झालेली ह्या मंडळींनी हाच निधी आपल्या ठेकेदार कार्यकर्त्यांच्याच खिशात जाईल, याची पुरती काळजी घेतली. आता मात्र जिल्हा वाऱ्यावर आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com