esakal | औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कमी झालेल्या कोरोना संसर्गाचा मार्चपासून जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. 

औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असले तरी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले लसीकरण व उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचा दर) वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा रिकव्हरी रेट पाच टक्क्यांनी वाढला आहे. या दिवसांत जिल्ह्यात तब्बल १४ हजार २५७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे ही दिलासादायक बाब असली तरी दुसरीकडे या दहा दिवसांतच नवीन सुमारे पंधरा हजार रुग्णांची भर पडली आहे. 

आम्हाला काळजी ठेकेदारांची; रुग्ण तडफडू देत, कोरोना लस संपली अन् रेमडेसिविरचा काळाबाजार

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कमी झालेल्या कोरोना संसर्गाचा मार्चपासून जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. गेल्या सव्वा महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थातच रिकव्हरी रेट खूपच खालावला होता. तर मृत्यू दरातही वाढ झाल्याने केंद्रीय पथकाने मध्यंतरी पाहणी करताना येथील आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांतील उणिवांवर बोट ठेवत ताशेरे ओढले होते. मार्चमध्ये शहरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट १२५ वरून थेट ७७ पर्यंत घसरला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. दरम्यान, १ एप्रिल रोजी रिकव्हरी रेटमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होऊन तो ७९ वर आला.

Corona Updates: औरंगाबादेत बाराशे कोरोनाबाधित वाढले, आणखी दीड हजार रुग्ण बरे 

१ एप्रिलनंतर शहरासह जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. दुसरीकडे संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदराचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले. याचा परिणाम म्हणून रिकव्हरी रेट तब्बल पाच टक्क्यांनी वाढला. पर्यायाने मृत्यूदर कमी करण्यात काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसत आहे. प्राप्त अहवालानुसार, शनिवारी (ता.दहा) शहराचा रिकव्हरी रेट हा ८४ टक्के एवढा नोंदला गेला. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार, १ ते १० एप्रिलदरम्यान शहरासह जिल्ह्यात एकूण १४ हजार ७३८ रुग्णांची वाढ झाली. तर त्या प्रमाणात १४ हजार २५७ रूग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. 

वाढता संसर्ग 
ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा व महापालिका प्रशासन कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही. उलट तो वाढत आहे. शनिवारी (ता. दहा) रूग्णवाढीचा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात १,९६४ रूग्ण निघाल्याने पुन्हा एकदा हादरा बसला आहे. 

१ ते १० एप्रिलपर्यंतची स्थिती 
० नवीन आढळलेले रूग्ण : १४,७३३ 
० उपचारानंतर बरे झालेले : १४,२५७ 
० जिल्ह्यात एकूण मृत्यू : २८२ 

संपादन - गणेश पिटेकर
 

loading image
go to top