esakal | औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद खंडपीठ
औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’
sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांबाबत औरंगाबाद खंडपीठाने (Bambay High Court Aurangabad Bench) स्वतःहून दखल घेत दाखल करून घेतलेल्या सुमोटो जनहित याचिकेत मास्कचा वापर, आधारकार्ड सोबत बाळगणे आणि घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीधारकांना तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचे (Helmet Compulsory) करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर काहीच अंमलबजावणी न झाल्याचे निदर्शनास येताच यासंदर्भात काय कारवाई केली याची विचारणा खंडपीठाने सोमवारी केली होती. त्यामुळे आता शहर पोलिस प्रशासनाचे ‘वरातीमागून घोडे’ निघाले असून खंडपीठाने खडसावल्यानंतर शहर पोलिस विभागातर्फे (Aurangabad City Police) १६ मेपासून हेल्मेटसक्तीचे परिपत्रक मंगळवारी (ता.चार) काढण्यात आले.(Aurangabad Live Updates From 16 May Helmet Compulsory In Aurangabad)

हेही वाचा: पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

कोरोनाबाधितांची हेळसांड, तसेच खासगी रुग्णालयाची मनमानी, एखाद्या बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांची मृत्यू प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ आदींची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. यासंदर्भात सुनावणीदरम्यान खंडपीठाने २२ एप्रिल रोजी हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र २२ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती करण्यात आली नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने मागील आदेशापासून आजवर हेल्मेट सक्ती तसेच मास्क वापर, आधारकार्ड सोबत बाळगणे यासारख्या आदेशासंदर्भात किती गुन्हे दाखल केले याची माहिती सादर करण्याचे आदेश सरकारी वकिलांना दिले होते. त्यानंतर मात्र पोलिस प्रशासनास जाग आल्याने १६ मेपासून हेल्मेट सक्ती करण्यासंदर्भातील आदेश मंगळवारी (ता.चार) सायंकाळी काढण्यात आले. दरम्यान, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी हेल्मेट सक्तीसंदर्भात मंगळवारी (ता.४) सायंकाळी जारी केलेल्या परिपत्रकात ५ मेपासून हेल्मेटसक्ती लागू करणार असल्याचे म्हटले. मात्र, रात्री उशिरा त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा १६ मे पासून हेल्मेट सक्ती असल्याचे प्रसारमाध्यमांना कळविले.

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

दुकाने बंद, हेल्मेट मिळतील का?

कोरोनाच्या शासन नियमानुसार शहर परिसरातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना दुसरीकडे १६ मे पासून हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले खरे; परंतु १६ मे नंतर दुकाने उघडतील का? दुचाकीधारकांना हेल्मेट मिळतील का? असा प्रश्नही समोर आला आहे. यासोबतच खंडपीठाने खडसावल्यानंतर सुरू करण्यात येणारी हेल्मेट सक्ती किती दिवस टिकते हाही प्रश्न उभा राहिला आहे.