esakal | निसर्गाचा निर्दयीपणा! वीज पडून दोघांचा औरंगाबाद तालुक्यात दुर्दैवी मृत्यू

बोलून बातमी शोधा

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू
निसर्गाचा निर्दयीपणा! वीज पडून दोघांचा औरंगाबाद तालुक्यात दुर्दैवी मृत्यू
sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : करमाडसह (ता.औरंगाबाद) परिसरात रविवारी (ता.दोन) सायंकाळी पाच वाजेपासुन आकाशात काळाकुट्ट ढगांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसात जयपूर (ता.औरंगाबाद) येथे पावणेसहाच्या सुमारास वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सुनील त्रिगोटे व प्रकाश शिंदे (मसनतपुर, चिकलठाणा) असे दोघे जण मृत्युमुखी पडले. श्री. त्रिगोटे यांचा यावेळी जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या श्री.शिंदे यांना करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा: Rain Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत पाऊस

दरम्यान, घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने ते नेमके कोठुन कोठे व कशासाठी चालले होते व घटना कशी घडली याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, सदरील दोघेही जण समृध्दी महामार्गालगतच्या लाडसावंगी रस्त्यावरून घरी जात होते. जयपूर शिवारातून जात असताना श्री.त्रिगोटे यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत असतानाच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी वीज कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. वीज अंगावर पडताच दोघांच्याही ओरडण्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रूग्णालयात पोहोचवले. तथापि यात यश येऊ शकले नाही.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

कमी-अधिक पाऊस आणि विजा

सायंकाळी साडेपाचपासून करमाड परिसरातील करमाड, लाडगाव, टोणगाव, कुंभेफळ, सटाणा, दुधड, जयपूर, भांबर्डा परिसरात काही ठिकाणी पंधरा, तर काही ठिकाणी अर्धातास हा बिगर मोसमी जोरदार पाऊस पडला. यात कित्येक ठिकाणी जोरदार वारेही वाहिले. यात कुंभेफळ येथे कित्येक विजेचे खांब, झाडी, रस्त्यावरील पोस्टर्स बोर्ड कोसळून खाली पडल्याचे चित्र दिसून आले. करमाड व कुंभेफळ येथे सुमारे वीस मिनिटे जोरदार पाऊस पडला. मात्र, कुंभेफळ येथे मोठ्या सुसाट वार्‍याने मोठे आर्थिक नुकसान केले. यात चार-पाच विजेचे खांब कोसळले. जालना महामार्गावरील शेंद्रा एमआयडीसी चौकाजवळ एक झाड थेट महामार्गावर कोसळून खाली पडले. सुदैवाने यावेळी घटनास्थळी कुठलेच वाहन नव्हते. दरम्यान, यामुळे काही मिनिटे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी सर्व वाहतुक एकेरी काढुन देत करमाड पोलिसांनी जॅम झालेली वाहतुक सुरळीत करीत एकीकडे महामार्गावर पडलेले झाड बाजुला केले.