esakal | आजपासून एकनाथ महाराजांचे मंदिर चार दिवस बंद, नाथषष्ठी यात्रा उत्सव स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

nath maharaj yatra

कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे हा स्थगितीचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथषष्ठी यात्रा स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहे.

आजपासून एकनाथ महाराजांचे मंदिर चार दिवस बंद, नाथषष्ठी यात्रा उत्सव स्थगित

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी यात्रा उत्सव यंदाही स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.एक) ते रविवारी (ता.चार) असे चार दिवस यात्रेच्या कालावधीत संत एकनाथ महाराज यांचे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बुधवारी (ता. ३१)दिले आहे.


कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे हा स्थगितीचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथषष्ठी यात्रा स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे पालन स्थानिक प्रशासनाने केले आहे. मागील वर्षीही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा तरी यात्रा उत्सव साजरा होईल, अशी वारकरी व भाविकांना आशा होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी याबाबत यात्रा स्थगित करण्याचे आदेश काढल्यामुळे परंपरेनुसार महाराष्ट्रातून वारकऱ्यांचे पायी दिंडी सोहळे घेऊन येणाऱ्या वारकरी तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांचा हिरमोड झाला आहे.


दरम्यान, कोरोनामुळे नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याने यात्रेनिमित्ताने हातावर पोट घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले किंबहुना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा जनजीवन रुळावर येत असताना सुरु झालेले ग्रामीण अर्थचक्र पुन्हा बिघडणार आहे.नाथषष्ठी यात्रेला लाखोंच्या संख्येने नाथनगरीत दाखल होतात. षष्ठी, सप्तमी व अष्टमी असे तीन दिवस हा यात्रा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. त्यामुळे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये हा निर्णय घेतला आहे.

यात्रा काळातील धार्मिक विधी होणार!
कोरोनामुळे नाथांचे गोदाकाठीचे समाधी मंदिर व गावातील नाथांचा वाडा असलेले प्राचीन मंदिर बंद असले तरी परंपरेनुसार दोन्ही मंदिरातील विधिवत धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा विधी करताना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहे. यामुळे सरकारी यंत्रणेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image