esakal | औरंगाबाद महापालिकेला तीन महिन्यात तब्बल ७० कोटींचा फटका!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

औरंगाबाद महापालिकेला तीन महिन्यात तब्बल ७० कोटींचा फटका!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे शहरातील व्यवहार अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल ७० कोटीने वसुली कमी झाली आहे. मालमत्ता करापोटी ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना फक्त २७ कोटींची वसुली झाली आहे, तर पाणीपट्टीपोटी ३६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत असताना केवळ साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.

मालमत्ताकर व पाणीपट्टीची अत्यल्प वसुली व विकास कामांवर होणारा अवाढव्य खर्च यामुळे महापालिका गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांची रक्कम तब्बल अडीचशे कोटींवर गेली होती. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी वसूली वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे प्रशासाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. महापालिकेला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तीन महिन्यात तब्बल ७० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात मालमत्ता करापोटी ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते. पण प्रत्यक्षात वसुली २७ कोटी एवढी झाली. तसेच पाणीपट्टीपोटी ३६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षीत होती पण सहा कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत.

हेही वाचा: 'महाकार्गो'चा मोठा पल्ला; अडीच कोटींचा गल्ला!

सरासरी ४० टक्केच वसुली झाली आहे. महापालिकेने शहरातील अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. त्यापोटी तीन महिन्यात आठ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते पण केवळ ५० लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. वसूलीत ६० टक्क्यांचा फटका बसला असला तरी खर्च मात्र कमी झालेला नाही. अत्यावश्‍यक कामापोटी उत्पन्नातील ६५ टक्के रक्कम महापालिकेला खर्च करावी लागते. पण केवळ ४० टक्केच वसूली झाल्यामुळे महापालिकेवरील आर्थिक संकट वाढले आहे.

तीन महिन्यातील ताळेबंद (कोटीत)

कर उद्दिष्ट वसुली

मालमत्ता कर ६० २७
पाणीपट्टी ३६ ६.५०
मालमत्ता विभाग ०८ ००.५०

हेही वाचा: औरंगाबादेत सहायक पीआयला दीड लाखांचा गंडा!

महिन्याचा अत्यावश्‍यक खर्च (कोटीत)

कर्मचाऱ्यांचे वेतन-२२
पाणी पुरवठा वीज बिल-४
पथदिवे- ७५ लाख
कर्जाचे हप्ते-१
एसटीपी प्लांट वीजबील- ७० लाख
कर्मचारी पेन्शन-३
शिक्षण विभाग-२
बचत गट कर्मचारी वेतन-१

loading image