महापालिका निवडणुक : व्याप्ती वेगळी, नकाशे वेगळे

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग व महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी केलेली आणखी एक गडबड चव्हाट्यावर आली आहे. वॉर्ड क्रमांक ८१ संजयनगर-मुकुंदवाडीची व्याप्ती वेगळी व नकाशा वेगळा दाखविण्यात आला असल्याचे समोर आले आहे. वॉर्डरचना अंतिम करताना ही चूक सुधारण्यात आलेली नाही, हे विशेष. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काही पदाधिकारी व दिग्गज नगरसेवकांची सोय करण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अनेक गडबडी केल्याचे समोर आले होते. प्रगणक गट मनमानी पद्धतीने या वॉर्डातून त्या वॉर्डात टाकणे, निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन न करता वॉर्डांच्या हद्दी तोडणे, असे प्रकार या अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे या वादग्रस्त प्रारूप वॉर्डरचनेवर तब्बल ३७० आक्षेप घेण्यात आले. त्यावर साखर आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, वॉर्डरचना अंतिम करताना किरकोळ बदल करण्यात आले. हे बदल करताना वॉर्डाच्या आरक्षणात बदल होणार नाहीत, याची काळजी मात्र घेण्यात आली. तसेच नव्याने काही गडबडी करण्यात आल्याचे समोर येत आहे. वॉर्ड क्रमांक ८१ संजयनगर-मुकुंदवाडीची लोकसंख्या नऊ हजार ८२४ एवढी आहे. अधिकाऱ्यांनी परिशिष्ट-२ (हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत) मध्ये कोणतेही बदल केले नाही. या प्रभागाची व्याप्ती वेगळी व नकाशा वेगळा-वेगळा आहे. त्यावर आक्षेप घेतल्यानंतरही बदल करण्यात आला नाही. 

व्याप्ती ग्राह्य धरायची का नकाशा? 
पूर्व दिशेला गल्ली क्रमांक सहा संजयनगरमधील छोटू दादाराव शेलार यांचे घर ते शीतल प्रोव्हिजन तुळसाबाई भातपुडे ते पिठाच्या गिरणीजवळील बिरबल सरोदे यांचे घर ते काव्य डिजिटल स्टुडिओ, विकास पाटील यांचे घर, घर क्रमांक एन-२, एम-२, २५-१ ते रायगड निवास घर क्रमांक एन-२, एम-२, ९-१२ ते आर. बी. साबळे, एन-२-१६, रामनगर ते ढवळे साऊंड सर्व्हिस ते साई प्रोव्हिजन, क्षीरसागर संघर्षनगर यांचे घर ते सुदर्शन किराणा संघर्षनगर ते शाहूनगर बुद्धविहारसमोरील सिडको विकास योजना रस्त्यावरील टी-जंक्शनपर्यंत अशी हद्द दाखविण्यात आली. मात्र यातील निम्मा भाग प्रभागातून वगळण्यात येऊन विठ्ठलनगर प्रभागाला जोडण्यात आला. व्याप्ती व नकाशामध्ये मात्र हा भाग दाखविण्यात आला नाही. व्याप्ती ग्राह्य धरायची की, नकाशा ग्राह्य असा प्रश्न मतदारांना पडला आहे. हा गंभीर प्रकार एका विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतरही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. 
 
नागरिकांची केली दिशाभूल 
राज्य निवडणूक आयोगाला हाताशी धरून महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी हा कारनामा केल्याचे बोलले जात आहे. संजयनगर-मुकुंदवाडी प्रभागाची व्याप्ती वेगळी व नकाशा वेगळा असल्यामुळे रवी चौतमल यांनी आक्षेप दाखल केला होता; मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. विशिष्ट व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्डातील नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप रवी चौतमल यांनी पत्रकारांसोबत बोलताना केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com