esakal | झाडे न तोडता करा मुंडे स्मारक
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक वादात सापडले आहे. महापालिकेने एकही झाड न तोडता हे स्मारक उभारण्यासाठी सिडकोने नवा आराखडा तयार करावा, असे पत्र दिले आहे. कारण जुन्या आराखड्यानुसार 110 झाडांचा बळी जाणार आहे. 

झाडे न तोडता करा मुंडे स्मारक

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद- वृक्षतोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला आहे. मुंबईतील आरे कारशेडमध्ये यापुढे झाडाचे एकही पान तोडले जाणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करीत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये हजारो झाडांचा बळी दिला जात असल्याचे ट्‌विट केले. त्याला शिवसेनेने जशास तसे उत्तर दिले; मात्र आता झाडे तोडण्यावरून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक वादात सापडले आहे.

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा

महापालिकेने एकही झाड न तोडता हे स्मारक उभारण्यासाठी सिडकोने नवा आराखडा तयार करावा, असे पत्र दिले आहे. कारण जुन्या आराखड्यानुसार 110 झाडांचा बळी जाणार आहे. दूध डेअरीच्या जागेवर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्मारक उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्याचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला. या स्मारकाच्या बांधकामासाठी सुमारे 55 कोटींचा खर्च होणार आहे.

शासनाने निधी मंजूर केल्यानंतर सिडकोने स्मारकाचा आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार स्मारकाच्या जागेवर असलेली 110 झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिलेल्या आदेशानुसार उपायुक्तांनी मुंडे स्मारकासाठी झाडे न तोडता आराखडा तयार करावा, असे पत्र सिडको प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली होती. यावेळी पर्यावरणप्रेमींनी त्यांना झाडे तोडू नका, असे आवाहन केले. त्यावर एकही झाड तोडणार नाही, उलट या ठिकाणी झाडे लावली जातील. पक्षी, माणसांसाठी फायद्याची ठरतील अशी झाडे लावू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत महापालिकेने मुंडे स्मारकासाठी झाडे तोडण्यास परवानगी न देता सिडकोला आराखडा बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

loading image