अपेक्षेप्रमाणे नाही; पण काम समाधानकारक; महापौरांची खंत

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : माझ्याकडून शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या, शंभर टक्के अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; पण समाधानकारक काम केले. ४७ सर्वसाधारण सभा घेतल्या, १३८० ठराव झाले. तथापि, पाणीपुरवठा योजना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन माझ्या कार्यकाळात होऊ शकले नाही, अशी खंत मावळते महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली. 

महापौर घोडेले यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी (ता. २९) पूर्ण झाला. त्यानिमित्ताने पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले, की पदभार घेतला तेव्हा शहरावर कचऱ्याचे मोठे संकट होते आणि आज कार्यकाळ संपला तेव्हा कोरोनाचे संकट आहे. कचराकोंडीतून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागला. आजही कचऱ्याची समस्या कायमच आहे. एकमेव चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे. हर्सूल प्रकल्पाचे काम सुरूच होऊ शकले नाही. पडेगावचे काम प्रगतिपथावर आहे तर कांचनवाडी प्रकल्पदेखील लांबणीवर पडला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय झाले पाहिजे; मात्र कचरा, पाणी, पथदिवे यावरच अधिक वेळ वाया जातो, ही कामे प्रशासकीयस्तरावर सुटली असती तर अधिक चांगले काम करता आले असते; मात्र शहर बससेवा, कचराप्रक्रिया प्रकल्प, रोझ गार्डन, आकृतिबंध मंजुरी, प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणी यासह इतर कामे झाली. पाणीपुरवठा योजनेसह शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम सुरू होऊ शकले नाही, मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न सोडवू शकलो नाही, संत एकनाथ रंगमंदिराचे काम करू शकलो नाही, याची खंत आहे, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली. 

लोकसभेचा पराभव वाईटच 
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे समर्थक म्हणून श्री. घोडेले ओळखले जातात; मात्र घोडेले महापौर असताना शहरातील जनतेमध्ये पाणी, कचऱ्याच्या प्रश्‍नावरून प्रचंड नाराजी होती. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना बसल्याचे बोलले जाते. त्याचा उल्लेख करत घोडेले यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव वाईट होता. त्यानंतर मात्र विधानसभेच्या शहरातील तीनही जागा व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही जिंकली, असेही महापौर म्हणाले. 
 
विकास आराखड्यामुळे रखडला विकास 
शहराचा सुधारित विकास आराखडा चार वर्षांपासून न्यायप्रविष्ट होता. त्यामुळे शहराचा विकास रखडला. कर्मचारी भरतीचा आकृतिबंधदेखील लवकर मंजूर झाला असता तर महापालिकेची कामे लवकर मार्गी लागली असती, असे महापौर म्हणाले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com