Aurangabad Paithan Polluted water Citizens health risk
Aurangabad Paithan Polluted water Citizens health risksakal

औरंगाबाद : पैठणकरांच्या नशिबी दूषित पाणी

नागरिकांचे आरोग्य धोक्यात ः पाण्याच्या जारमुळे आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ

पैठण : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासकांनी दखल घेऊन शहरात शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत असून मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील पाणीपुरवठा गेल्या एक महिन्यापासून विस्कळित झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याच्या तक्रारीदेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. नगरपालिकेत मात्र, शुद्ध पाण्याच्या जारचा वापर केला जात आहे. यामुळे पैठणकर रोष व्यक्त करीत आहेत. शहराला गोदावरीसह जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर या धरणातून तसेच योजनेतून ५० लाख लिटर पाण्याचा धरणावरील जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, जलशुद्धीकरण केंद्र कालबाह्य झाल्याने शहराला दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे. शहराला मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. विविध भागात अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा होत असताना पालिकेतील कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी मात्र शुद्ध पाण्याच्या जारमधील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, शहरात अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक व्यापारीवर्ग व नागरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या जारचा वापर करीत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वेळेवर होत नसलेल्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचा नागरिकांचा पाढा सुरुच आहे. प्रशासकांनी दखल घेऊन येथे शुद्ध पाणी पुरवठा करावा तसेच अवेळी येणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील सर्व भागातील नागरिकांना अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . मात्र, पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या एक महिन्यापासून पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळित झाली आहे. पालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शुध्द व सुरळीत पाणी पुरवठा करावा. नसता भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.

- सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष, पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com