औरंगाबाद : पोलिस प्रशिक्षणाच्या नावाखाली बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

औरंगाबाद : पोलिस प्रशिक्षणाच्या नावाखाली बलात्कार

औरंगाबाद : पो‍लिस भरतीसाठी ट्रेनिंग देतो असे सांगत मानलेल्या बहिणीच्‍या अल्पवयीन बहिणीवर बलात्‍कार करणारा नराधम रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा (वय २३, रा. भावसिंगपुरा) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ६२ हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के. आर. चौधरी यांनी बुधवारी ठोठावला. ठोठावलेल्या दंडापैकी २५ हजारांची रक्कम नुकसानभरपाई म्हणून अल्पवयीन पीडितेला देण्‍याचेही न्‍यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानुसार, पीडितेच्या आई-वडिलांचे निधन झाले असून मोठी बहिण पीडितेला संभाळते. आरोपी हा पीडितेच्‍या मोठ्या बहिणीने मानलेला भाऊ आहे. २४ ऑगस्‍ट २०२१ रोजी रक्षाबंधन असल्याने आरोपी हा मित्रासोबत पीडितेच्‍या घरी आला तेव्‍हा दोघी बहिणी घरी होत्‍या. आरोपीला राखी बांधल्यानंतर त्‍याने ओवाळणी देण्‍यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मात्र तुला पोलिस भरतीसाठी ट्रेनिंग देईल, एक तारखेपासून ट्रेनिंग सुरू करू असे म्हणत तेथून तो निघून गेला. ३१ ऑगस्‍ट २०२१ रोजी पीडितेची मोठी बहीण ड्युटीला गेल्याने पीडिता ही एकटीच घरी होती.

सकाळी आरोपी हा पीडितेच्‍या घरी आला. त्‍याने ट्रेनिंगच्या नावाखाली दर्गा परिसरात आणले. त्यानंतर तिथे आरोपीचे दोन मित्र कारमध्‍ये होते. आरोपीने पीडितेला कारमधून बीड बायपास रोड परिसरातील राजेशनगरात आणले. या ठिकाणी असलेल्या एका दुमजली इमरातीतील एका खोलीत बलात्‍कार केला व त्याचे मोबाईलमध्‍ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. याबद्दल कोणाला काही सांगितल्यास रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन अशी धमकी दिली. या प्रकरणात पुंडलि‍कनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. या प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक एम.एल. चव्‍हाण यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ आणि पोक्सोच्‍या कलम ४ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी २५ हजार रुपयांचा दंड, कलम ३५४ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड, कलम ३५४ (अ) आणि पोक्सोचे कलम ८ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी ५ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.

Web Title: Aurangabad Police Training Abuse Minor Girl Accuse Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..