औरंगाबाद : शिवसेना-शिंदे गटात संघर्षवाढीची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

औरंगाबाद : शिवसेना-शिंदे गटात संघर्षवाढीची शक्यता

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता खरी शिवसेना कोणाची हा वाद उफाळून आला आहे. युवा सेनेतून हकालपट्टी झालेले राजेंद्र जंजाळ यांचे राजकीय पुनर्वसन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. जंजाळ यांची शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जंजाळ समर्थक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या निषेधार्थ युवा सेनेचा त्याग केला आहे.

राजेंद्र जंजाळ हे युवासेनेचे उपसचिव, महापालिकेतील माजी उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, सभागृह नेता म्हणून कार्यरत होते. युवासेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या मोजक्या विश्वासूंपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र श्री. शिंदे यांच्या बंडात संजय शिरसाट सहभागी झाल्यानंतर जंजाळ देखील त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून त्यांची युवासेनेच्या उपसचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

तेंव्हा श्री. जंजाळ यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप करत मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी आपली हकालपट्टी करायला लावल्याचा आरोप केला होता. मुंबईत शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिरसाट समर्थकांना घेऊन जाण्याची महत्वाची जबाबदारी देखील जंजाळ यांनी पार पाडली होती. आता त्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी औरंगाबादचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही सुटलेला नसला तरी, शिंदे यांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून जंजाळ यांची नियुक्ती केल्याने संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२२) झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना नेते यांनी श्री. जंजाळ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल तीव्र नाराजी दर्शवत युवा सेनेतील श्री. जंजाळ समर्थक २१ पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

५१ आमदार आणि १२ खासदार असलेली आमची खरी शिवसेना आहे. विकासकामे करण्यासाठी माझ्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच जिल्ह्यात सर्व नविन नियुक्त्या करणार आहे.

-राजेंद्र जंजाळ, शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख

शिवसेनेत एक पद्धत आहे. शिवसेनतील सर्व नियुक्त्या ‘सामना’तून प्रसिद्ध होत असतात. त्याच नियुक्त्या ग्राह्य धरल्या जातात. राजेंद्र जंजाळ यांची ही नियुक्ती सामनातुन येते की नाही हे समजेल.

- आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Web Title: Aurangabad Shiv Sena Shinde Group Possibility Conflict

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..