औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रशासनाचे पाण्याचे नियोजन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad High Court

औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रशासनाचे पाण्याचे नियोजन सुरू

औरंगाबाद : शहरात तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा अनेक वर्षांपासून विस्कळित आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागला. शहराला पाणी पुरवठा करणारा नाथसागर काठोकाठ भरलेला असताना नागरिकांना मात्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते, यामुळे महापालिकेवरील रोष वाढत आहे. सध्या महापालिकेतर्फे काही भागात चार तर काही भागात पाच दिवसाआड पाणी दिले जाते. पाणी टंचाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाची काय तयारी आहे, याची माहिती घेतली असता अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखत महापालिकेने नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणी साठवण्याची आवश्‍यक तेवढी सोय नाही. त्यामुळे तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी अडचणी आहेत. असे असले तरी तीन दिवसांआड पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी नियोजन केले जात आहे. नागरिकांना रात्री-अपरात्री पाणी दिले जाऊ नये, याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी किमान दीड ते दोन महिन्यात तीन दिवसाआड पाणी दिले जाऊ शकते, असे अधिकाऱ्याने नमूद केले.

आता ८० ठिकाणी कामे

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पूर्वी ७२ कामांचा समावेश होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून, ८० ठिकाणी कामे केली जात आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही कामे केली जात आहेत.

Web Title: Aurangabad Water Planning Administration Started After The Order Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..