Aurangabad Women : विवाहित महिला मिसिंगची कारणे घरातच दडलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad Women : विवाहित महिला मिसिंगची कारणे घरातच दडलेली

औरंगाबाद : एखादी विवाहित महिला मिसिंग होते याची कारणे घरातूनच सुरू होतात. हल्ली अनेकांना घर असुरक्षित वाटायला लागलं आहे. छोट्या छोट्या कारणांमधून घरात होणारे वाद, बदलती जीवनशैली, स्त्रियांना मिळणारी असमानतेची वागणूक ,स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबी समजून न घेतल्याने महिला मिसिंग होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, असे मत भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी व्यक्त केले.

सजग महिला संघर्ष समितीतर्फे रविवारी मिसिंग महिलांची वाढती संख्या, वास्तव, कारणे आणि कुटुंबातील असमानता या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आम्रपाली तायडे यांनी मिसिंग महिलांबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सोशल मीडियाचा वाढता वापर, चंगळवादीवृत्ती, विभक्त कुटुंबपद्धती, जुने प्रियकर, इतरांकडून मिळत असलेली सहानुभूती अशा अनेक कारणांमुळे महिला घर सोडतात. कुटुंबातील संवाद वाढल्यास, प्रत्येक वादावर चर्चा घडवून आणल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते. अज्ञान, बालविवाह, आमिषाला बळी पडणे, मोठ्या पदावरची नोकरी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो; परंतु घर सोडून गेल्यानंतर अनेक आव्हानांना विवाहित महिलांना सामोरे जावे लागते हे सगळं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.

यावेळी डॉ. रश्‍मी बोरीकर, नम्रता फलके, मंगल खिंवसरा, माजी नगरसेविका रेखा जयस्वाल, संजीवनी दिपके, जयश्री शेंडगे यांनी आपली मते मांडली. बैठकीस डॉ. शकुंतला लोमटे, ॲड.ज्योती पत्की, सुनीता जाधव, मीना खंडागळे, ॲड. जयश्री देशपांडे, स्मिता हस्तक, रूपाली बाविस्कर, डॉ. आरतीशामल जोशी, मंजुषा माळवतकर, पोलिस नाईक रूपा साकला, पोलिस नाईक संगीता परळकर, अंमलदार गिरिजा आंधळे, डॉ.चारुलता रोजेकर, मीना खंडागळे, ॲड. सुजाता पाठक, पत्रकार मंजिरी काळवीट, रजनी नागवंशी, सरस्वती जाधव, प्रा. विद्या पाटील, सामाजिक न्याय उपायुक्त जयश्री सोनकवडे, प्राजक्ती भोसले, गीता खांबेकर, डॉ. अनू मधाळे, कल्पना राजपूत आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अंमलदार सीमा वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.