Beed : अंबाजोगाई, परळीतील सत्तर गावे अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed MSCB  Electricity

Beed : अंबाजोगाई, परळीतील सत्तर गावे अंधारात

घाटनांदूर : अंबाजोगाई व परळी तालुक्यातील जवळपास सत्तर गावांचा वीज पुरवठा शुक्रवारी (ता.१४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास परळी तालुक्यातील मरळवाडीजवळ असलेल्या चार वीज उपकेंद्रांना वीज पुरवठा करणारी ३३ केव्ही.ची तार तुटल्यामुळे व विजांचा कडकडाट सुरु असताना काही इन्सुलेटर फुटल्याने खंडित झाला होता. दिवसभर या वहिनीची तपासणी व दुरुस्तीसाठी कामगार फिरकलेच नाही, परिणामी सर्व गावांतील वीज पुरवठा शुक्रवारी रात्रभर देखील बंदच राहिला. जो शनिवारी (ता.१५) सायंकाळपर्यंत सुरू झाला नव्हता. यामुळे ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

हेही वाचा: Beed : बाधित क्षेत्रातील उत्पादनात होऊ शकते ५० टक्के घट

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, पट्टीवडगाव व परळी तालुक्यातील धर्मापुरी व सारडगाव या चार ३३ के.व्ही. उपकेंद्रातून दोन तालुक्यांतील जवळपास ७० गावांना वीज वितरीत केली जाते. या चारही वीज उपकेंद्रांना परळी येथील जीसीआर वीज केंद्रातून वीज पुरवठा होतो. येथील केंद्रातून वरील चार उपकेंद्रांना पुरवठा होणाऱ्या ३३ केव्ही वीज वितरण वाहिनीला अहमदपूर फिडर या नावाने ओळखले जाते. शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेदरम्यान या ३३ केव्ही लाईनला वीज पुरवठा करणारी तार परळी तालुक्यातील मरळवाडी जवळ तुटल्यामुळे ७० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा: Beed : ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले

झालेला हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी एकही अधिकारी अथवा कामगार इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे ७० गावांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, परळी व अंबाजोगाई येथील दोन उपकार्यकारी अभियंता व तीन कनिष्ठ अभियंता आणि जवळपास चार डझन कर्मचाऱ्यांचा ताफा या अहमदपूर फिडरवरील गावांच्या सेवेकरिता आहेत. मात्र अधिकाऱ्यांचा कामगारांवर कामाच्या बाबतीत वचकच राहिलेला नाही. त्यामुळे क्षुल्लक कारणामुळे नेहमीच या ७० गावांचा वीज पुरवठा दोन-दोन दिवस बंद राहतो. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. रात्री आठ वाजेपर्यंत गावांत वीज नव्हती.

हेही वाचा: Beed : ‘जलजीवन’च्या ४०८ कामांना स्थगिती

तासाभरात होऊ शकणारे तार जोडण्याचे काम परळी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे होऊ शकले नाही. त्यामुळे सत्तर गावांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचा कामगारांवर वचकच राहिलेला दिसत नाही.

- विठठल भताने, सरपंच, भतनवाडी

हेही वाचा: Beed : फडणवीस-पंकजा मुंडेंचा एकाच चॉपरमधून प्रवास; नाराजी दूर झाली का?

कामगार दिवसभर दुरुस्तीसाठी फिरकलेच नाहीत. दोषी कामगारांना कठोर शासन करून भविष्यात अशी चूक होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी.

- प्रकाश फड सरपंच, धसवाडी

शुक्रवारी (ता.१४) सकाळी विजेच्या कडकडाटांमुळे अनेक इंन्सूलेटर खराब झाले. परळीच्या ग्रीड कंट्रोल रुममध्ये ब्रेकर नादुरूस्त झाले असल्याने वीज पुरवठा सुरुळीत करण्यास वेळ लागत आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळीत सुरू होईल.

- विलास मिसाळ, उपकार्यकारी अभियंता, अंबाजोगाई